मुंबई पोस्टलचे आव्हान संपुष्टात
पांचगणी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा
कोल्हापूर पोलीस आणि ठाणे पोलीस यांनी पांचगणीमधील वातावरणाशी समरस होत सुरेख खेळ करीत व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेच्या बाद फेरीत प्रवेश केला. मुंबई पोस्टलचे आव्हान मात्र साखळीमध्येच संपुष्टात आले आहे.
पांचगणी व्यायाम मंडळातर्फे पांचगणीतील भाऊसाहेब भिलारे क्रीडांगणावर चालू असलेल्या या स्पध्रेत कोल्हापूर पोलिसांनी शनिवारी सकाळच्या सत्रात जे.जे.हॉस्पिटलचा ३०-१४ असा धुव्वा उडविला. महेश भगतच्या दमदार चढाया आणि किसन जाधव, सुल्तान डांगे यांच्या पकडींच्या बळावर कोल्हापूर पोलिसांनी दोन लोणसहित हा सामना जिंकला. जे.जे. हॉस्पिटलकडून हरिदास भायदेने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले. त्यानंतर दुपारच्या सत्रात कोल्हापूर पोलिसांनी मुंबई बंदरला ८-८ असे बरोबरीत रोखून आपला बाद फेरीतील प्रवेश निश्चित केला. याचप्रमाणे ठाणे पोलिसांनी आपला दुसरा विजय नोंदवताना मुंबईच्या स्पा इंटरप्रायझेसचा १८-१० असा पराभव केला.
तत्पूर्वी, स्पा इंटरप्रायझेसने रंगतदार सामन्यात २०-१७ अशा फरकाने मुंबई पोस्टल संघाला नमवून विजयी सलामी नोंदवली. स्पा संघ हा मध्यंतराला ५-७ असा दोन गुणांनी पिछाडीवर होता. पण दुसऱ्या सत्रात अमित चव्हाणने एका चढाईत तीन गुण घेत स्पा संघाच्या आशा जिवंत केल्या. सामना संपण्यासाठी तीन मिनिटे शिल्लक असताना नागेश चांदेकरने एका चढाईत तीन गुण मिळवत सामन्याचा निकाल स्पा संघाकडे झुकविला. मुंबई पोस्टलकडून प्रांजल पवारने सामना वाचविण्यासाठी झुंजार प्रयत्न केले.
स्थानिक ५० किलो वजनी गटात पांचगणी विभाग संघाने दिनबंधू क्रीडा मंडळाचा (भुइंज) २६-२० असा पराभव केला आणि विजेतेपद प्राप्त केले. पांचगणी संघाच्या प्रतीक आंब्राळेने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले. दिनबंधू संघाकडून महेश शेवतेने चौफेर चढाया केल्या.