कोलकाता नाइट रायडर्सची विजयी घोडदौड यंदाच्या आयपीएलमध्ये सातत्याने सुरू आहे. गुणतालिकेत आघाडीवर राहणाऱ्या कोलकाताच्या वर्चस्वाला आव्हान देणे हे कोणत्याही संघासाठी अवघड ठरत आहे. रविवारी गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांची लढत असल्यामुळे क्रिकेटरसिकांना रंगतदार लढतीचा आनंद घेता येऊ शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोलकाताने ९ सामन्यांत १४ गुण मिळवत आयपीएल गुणतालिकेत आघाडी टिकवली आहे, तर ९ सामन्यांत ११ गुण कमावणारा हैदराबादचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र कोलकाताचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये तेजाने तळपत आहे. त्यांचा कर्णधार गौतम गंभीरकडे ‘ऑरेंज कॅप’ आहे. सर्वात मौल्यवान खेळाडूच्या शर्यतीत सुनील नरिन अग्रेसर आहे, तर सर्वाधिक षटकार रॉबिन उथप्पाने खेचले आहेत.

कोलकाताने शुक्रवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध ७ विकेट्स आणि २२ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला होता. या सामन्यात कोलकाताने सांघिक कामगिरीचे प्रदर्शन केले. नॅथन कल्टर-निलेने ३ बळी घेतले, तर धावांचा पाठलाग यशस्वीपणे करताना गंभीर आणि उथप्पा यांनी धडाकेबाज अर्धशतके झळकावली.

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी होणाऱ्या सामन्यात कोलकाताविरुद्धच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी हैदराबादचा संघ उत्सुक आहे. १५ एप्रिलला झालेल्या सामन्यात कोलकाताचे १७३ धावांचे लक्ष्य दिले होते, मात्र हैदराबादला २० षटकांत १५५ धावा करता आल्याने त्यांचा १७ धावांनी पराभव झाला. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर, सलामीवीर शिखर धवन आणि अनुभवी केन विल्यमसन हे सातत्याने धावा करीत आहेत. शुक्रवारी रात्री मोहालीत पंजाबविरुद्ध हैदराबादने ३ बाद २०७ धावा करून २६ धावांनी विजय मिळवला.

सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolkata knight riders vs sunrisers hyderabad ipl
First published on: 30-04-2017 at 01:47 IST