भारत-इराण यांच्यात विजेता तिसऱ्या विश्वचषकावर नाव कोरणार, असे भाकीत स्पर्धा सुरू होण्याच्या आधीपासून म्हटले जात होते. परंतु सलामीच्याच सामन्यात भारताला धक्का दिल्यामुळे कोरियाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या भारत-थायलंड यांच्यातील उपांत्य लढतीपेक्षा कोरिया आणि इराण यांच्यातील लढतीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. परंतु ‘इराणी रणनीती’ यशस्वी ठरल्यामुळे उपांत्य फेरीत भारत-इराण समोरासमोर येत नसल्याचा आनंद दोन्ही संघांच्या संघनायकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होता.
गुरुवारी द एरिना स्टेडियमवर झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा कर्णधार अनुप कुमार म्हणाला, ‘‘उपांत्य फेरीचा सामना हा नेहमीच महत्त्वाचा असतो. कारण एक पराभव संघाचे आव्हान संपुष्टात आणतो. उपांत्य फेरीतील सर्वच संघ ताकदवान आहेत. परंतु त्यामुळे थायलंडविरुद्धच्या लढतीचे दडपण आहेच. परंतु अधिक आव्हानात्मक संघाशी अखेरीस लढणेच नेहमी सोयीस्कर असते.’’
२००४च्या पहिल्या विश्वचषक स्पध्रेतील साखळीत भारताने थायलंडला ५१-२९ अशा फरकाने पराभूत केले होते. ताजे आंतरराष्ट्रीय उदाहरण द्यायचे तर २०१४च्या आशियाई क्रीडा स्पध्रेत भारताने थायलंडचा ६६-२७ असा धुव्वा उडवला होता. मात्र ‘ब’ गटात इराणवगळता चारही संघांना हरवून उपांत्य फेरी गाठणाऱ्या थायलंडला कमी लेखून चालणार नाही. याविषयी अनुप कुमार म्हणाला, ‘‘कोरियाविरुद्ध पहिल्याच लढतीत पराभव झाल्यावर त्या रात्री माझ्यासह सर्वच संघसहकाऱ्यांना झोप लागली नव्हती. पण यातून एक महत्त्वाचा धडा आम्ही घेतला. त्यानंतर खेळाडू, प्रशिक्षक आणि सहयोगी यांच्यासह झालेल्या एका बैठकीत संघाच्या चुका आणि सुधारणा याबाबत चर्चा झाली. थायलंडकडे उत्तम आक्रमण आणि बचाव आहे, जपानविरुद्ध ते उत्तम खेळले. उपांत्य सामनासुद्धा रंगतदार होईल, अशी आशा आहे.’’
विश्वचषकाच्या यशस्वी चढाईपटूंच्या यादीत ४३ गुण मिळवणारा थायलंडचा कर्णधार खोमसाद थोंगखाम हा दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या खेळाबाबत कोणती रणनीती आखली आहे, हे मांडताना अनुप कुमार म्हणाला, ‘‘खोमसाद डाव्या बाजूने चढाया करतो. म्हणून त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य योजना आखली आहे.’’
भारताच्या आव्हानाविषयी खोमसाद म्हणाला, ‘‘जपानविरुद्ध सामन्यात आम्ही दडपणाखाली खेळलो, परंतु कामगिरी मात्र चांगली झाली. उपांत्य सामन्यात अजय ठाकूर आणि प्रदीप नरवाल यांच्या चढायांचे आव्हान असले, तरी आमचा बचाव सामथ्र्यवान आहे.’’
इराण-कोरिया विश्वचषकात प्रथमच एकमेकांसमोर भिडणार आहेत. मात्र आशियाई क्रीडा स्पध्रेत इराणने कोरियाला ४१-२२ असे आरामात नामोहरम केले होते. उपांत्य सामन्याविषयी कोरियाचा कर्णधार डाँग जू हाँग म्हणाला, ‘‘इराणचा संघ सर्वात बलाढय़ आहे. परंतु उपांत्य फेरीच्या दृष्टीने आमची तयारी उत्तम झाली असून, आम्ही आत्मविश्वासाने खेळू.’’
कोरियाने साखळीतील पाचही सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली आहे. याचप्रमाणे यांग कुन लीच्या गाठीशी प्रो कबड्डीचा अनुभव आहे. याबाबत इराणचा कर्णधार मेराज शेख म्हणाला, ‘‘सध्या तरी आम्ही कोणतेही दडपण घेतलेले नाही. आमच्या संघातील खेळाडूंच्या बचावाप्रमाणेच चढायांचे चापल्य हे लक्षवेधी असते. त्यामुळेच कोरियाला हरवून आम्ही अंतिम फेरी गाठू.’’