फुटबॉलप्रेमींसाठी आज रंगतदार सामन्यांची पर्वणी

माद्रिद : फुटबॉलशौकिनांसाठी शनिवारचा दिवस म्हणजे रंगतदार सामन्यांची पर्वणी घेऊन आला आहे. इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये लिव्हरपूल, मँचेस्टर युनायटेड, मँचेस्टर सिटी आणि चेल्सी हे अव्वल संघ, तर ला लीगा फुटबॉल स्पर्धेत बार्सिलोना, रेयाल माद्रिद आणि अ‍ॅटलेटिको माद्रिद हे संघ आपापल्या प्रतिस्पध्र्याशी झुंजतील.

ला लीगामध्ये तीन सामन्यांत फक्त एकच विजय मिळवून आठवे स्थान पटकावणाऱ्या बार्सिलोनाचा त्यांचा सामना शनिवारी मध्यरात्री १०व्या क्रमांकावरील व्हॅलेंसियाशी होईल. दुपारी ४ वाजता रेयाल माद्रिद वि. लेव्हांटे सामन्याची अनुभूती चाहत्यांना घेता येईल. रात्री १० वाजता अ‍ॅटलेटिको माद्रिदची लढत रेयाल सोसिएदादशी होईल.

इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये लिव्हरपूलने चार विजयांसह अग्रस्थान पटकावले असून दुपारी ५ वाजता होणाऱ्या सामन्यात त्यांना न्यूकॅसलशी झुंज द्यावी लागेल. दुसऱ्या क्रमांकावरील मँचेस्टर सिटी रात्री १० वाजता नॉर्विच सिटीशी भिडेल. मँचेस्टर युनायटेड वि. लिसेस्टर सिटी आणि चेल्सी वि. वुल्व्हस हे सायंकाळी ७.३० वाजता एकमेकांशी झुंजतील.