‘यॉर्कर किंग’ लसिथ मलिंगा हा बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर निवृत्ती स्वीकारणार आहे. बांगलादेशचा संघ श्रीलंकेत ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यापैकी २६ जुलैला कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये होणाऱ्या पहिल्या सामन्यानंतर मलिंगा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा करणार आहे. श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणरत्ने याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. १५ वर्षाच्या एकदिवसीय कारकिर्दीचा शेवट मलिंगा बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या सामन्यानंतर करणार आहे, अशी माहिती त्याने दिली. निवृत्तीनंतर मलिंगा कायमस्वरूपी श्रीलंका सोडणार असून ऑस्ट्रेलियात स्थायिक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मलिंगा पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर तो निवृत्त होणार आहे. त्याने मला असं सांगितलं आहे, पण त्याने निवड समितीला काय सांगितलं आहे ते मला माहिती नाही, असे करुणरत्ने म्हणाला. या नंतर मलिंगा ऑस्ट्रेलियाचे कायमस्वरूपी नागरिकत्व घेणार असून त्याच्या कुटुंबासह तो तेथेच स्थायिक होणार आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाल्यानंतर तो प्रशिक्षण केंद्र चालू करू शकतो असेही सांगण्यात येत आहे. आतापर्यंत अनेक खेळाडू निवृत्त झाल्यावर श्रीलंकेतून इतर देशांमध्ये प्रशिक्षणासाठी स्थायिक झाले आहेत.
मलिंगा सध्या ऑस्ट्रेलियामध्येच आहे. तो लवकरच त्याच्या मित्रांची भेट घेणार आहे. मलिंगाने मुख्य निवडकर्ते यांना कल्पना दिली आहे आणि श्रीलंकेत परतण्याची तारीखही सांगितली आहे. नुकत्याच झालेल्या विश्वचषक २०१९ मध्ये मलिंगाने १३ गडी टिपले होते.