विश्वविजेतेपद राखण्यासाठी भारताचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद याला आव्हानवीर मॅग्नस कार्लसन याच्याविरुद्धच्या लढतीत उर्वरित चार डावांपैकी तीन डाव जिंकावे लागणार आहेत. लढतीमधील नववा डाव गुरुवारी होणार आहे.
कार्लसन याने आनंदविरुद्ध आतापर्यंत झालेल्या आठ डावांअखेर ५-३ अशी दोन गुणांची आघाडी घेतली आहे. विजेतेपद मिळविण्यासाठी त्याला फक्त दीड गुणांची आवश्यकता आहे. कार्लसन याची आतापर्यंतची कामगिरी लक्षात घेता आनंदला उर्वरित चार डावांपैकी तीन डाव जिंकणे ही कठीण कामगिरी झाली आहे. कार्लसन याने आठव्या डावाच्या सुरुवातीपासूनच बरोबरीच्या दृष्टीने चाली केल्या होत्या. त्याचे कारकीर्दीतील पहिलेच विश्वविजेतेपद जवळजवळ निश्चित झाले असल्यामुळे तो उर्वरित चार डावांमध्ये कोणताही धोका पत्करणार नाही असा अंदाज आहे.
सामन्यास कलाटणी देण्याची क्षमता आनंदकडे आहे. चार डावांपैकी दोनच डावांमध्ये आनंदला पांढऱ्या मोहरांच्या साहाय्याने खेळण्याची संधी मिळणार आहे. त्याला कार्लसनविरुद्ध एकही डावजिंकता आलेला नाही. सहा डावांमध्ये त्याला बरोबरी स्वीकारावी लागली आहे तर दोन डावांमध्ये त्याला धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले होते. या दोन खेळाडूंमधील आठवा डाव केवळ ७५ मिनिटांमध्ये बरोबरीत राहिला होता. हे लक्षात घेता कार्लसन हा आपली आघाडीच कायम राखण्यावर भर देत आहे असे दिसून येत आहे. ६४ घरांचा सम्राट मानला गेलेल्या आनंदला पूर्ण ताकदीनिशी उर्वरित सर्व डावांमध्ये वर्चस्व राखावे लागणार आहे. कधीही न थकणारा वाघ अशीच आनंदची प्रतिमा असल्यामुळे तो लढतीस कलाटणी देईल अशी अपेक्षा आहे.
आनंदच्या तुलनेत कार्लसन हा अतिशय भक्कम बचाव करीत असल्यामुळे आनंदला त्याचा अभेद्य बचाव तोडून विजय मिळवावा लागणार आहे. आतापर्यंतच्या आठ डावांमध्ये त्याच्याकडून फारशा गंभीर चुका झालेल्या नाहीत.