Leander Paes Father Vece Paes Passes Away at 80: भारताचा महान टेनिसपटू लिएंडर पेस यांच्या वडिलांचं वयाच्या ८०व्या निधन झालं आहे. १९७२ च्या म्युनिक ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य असलेले डॉ. वेस पेस यांनी जगाचा निरोप घेतला आहे. डॉ. वेस पेस हे बऱ्याच काळापासून आजारी होते.

गुरुवारी सकाळी डॉ. वेस पेस यांचे कोलकाता येथे निधन झाले. मंगळवारी सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती पीटीआयने दिली आहे. वेस पेस हे दीर्घकाळ पार्किन्सन आजाराने ग्रस्त होते.

कोण होते डॉ. वेस पेस?

भारतीय हॉकी संघात मिडफिल्डर म्हणून खेळणाऱ्या पेस यांनी त्यानंतर अनेक खेळांमध्ये नाव कमावलं. डॉ. वेस हे फुटबॉल, क्रिकेट आणि रग्बी असे अनेक खेळ खेळले आहेत आणि १९९६ ते २००२ पर्यंत भारतीय रग्बी फुटबॉल युनियनचे अध्यक्ष म्हणूनदेखील त्यांनी काम पाहिलं आहे. आशियाई क्रिकेट परिषद आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) डोपिंग विरोधी शिक्षण कार्यक्रमांचे व्यवस्थापन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

पेस हे क्रीडा वैद्यकशास्त्रातील डॉक्टर होते आणि त्यांनी आशियाई क्रिकेट परिषद आणि बीसीसीआय व्यतिरिक्त अनेक क्रीडा संघटनांमध्ये वैद्यकीय सल्लागार म्हणून काम केले. त्यांनी कलकत्ता क्रिकेट आणि फुटबॉल क्लबचे अध्यक्ष म्हणूनही काम केले.

डॉ. वेस यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना, हॉकी इंडियाने त्यांना “भारतीय क्रीडाक्षेत्राचा अढळ आधारस्तंभ” आणि “भारतीय हॉकीच्या सुवर्णकाळातील करिष्माई मिडफिल्डर” असे संबोधत श्रद्धांजली अर्पण केली.

भारतातील एकमेव ऑलिंपिक पदक विजेती वडील-लेकाची जोडी

लिएंडर पेसचे वडील वेस यांनी माजी भारतीय बास्केटबॉल खेळाडू आणि बंगाली कवी मायकल मधुसूदन दत्त यांची पणतू जेनिफर डटनशी लग्न केले. त्यांचा मुलगा लिएंडर पेस एक प्रसिद्ध भारतीय टेनिसपटू आहे. १९९६ च्या ऑलिंपिकमध्ये पेसने टेनिसच्या एकेरी प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. इतकंंच नाही तर पेस आणि त्याचे वडील ही एकमेव भारतीय जोडी आहे, ज्यांच्या नावावर ऑलिंपिक पदकं आहेत.