भारताचा १८ ग्रँडस्लॅम विजेता सर्वाधिक अनुभवी टेनिसपटू लिएण्डर पेसने बुधवारी निवृत्तीचे संकेत दिले. आगामी २०२० हे वर्ष आपल्या कारकीर्दीतील अखेरचे वर्ष असल्याचे त्याने जाहीर केले.

४६ वर्षीय पेससाठी २०१९ हे वर्ष आव्हानात्मक ठरले. डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत सर्वाधिक ४४ सामने जिंकणाऱ्या पेसला १९ वर्षांत प्रथमच क्रमवारीत अव्वल १०० खेळाडूंच्या खाली घसरण झाली.

‘‘आंतरराष्ट्रीय टेनिसपटू म्हणून २०२० हे माझ्या कारकीर्दीतील अंतिम वर्ष असेल,’’ असे ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या पेसने ‘ट्विटर’वर पोस्ट केले.

‘‘आगामी वर्षांत मी ठराविकच स्पर्धामध्ये सहभागी होणार असून या स्पर्धामध्ये भारताला विजेतेपद मिळवून देण्यासाठी मी सर्वस्व पणाला लावेन,’’ असेही पेसने सांगितले. याव्यतिरिक्त पेसने त्याचे वडील डॉ. व्हीस आणि आई जेनिफर यांचेही आभार मानले. ‘‘माझ्या आई-वडिलांनी कारकीर्दीच्या प्रत्येक टप्प्यावर साथ दिल्यामुळे मी त्यांचा ऋणी राहीन. त्यांच्याशिवाय मी इथवर मजल मारू शकलो नसतो,’’ असे पेस पुढे म्हणाला.

पेसची ग्रँडस्लॅम विजेतेपदे

पुरुष दुहेरी (८)

* ऑस्ट्रेलियन स्पर्धा : २०१२

* फ्रेंच स्पर्धा : १९९९, २००१, २००९

* विम्बल्डन स्पर्धा : १९९९

* अमेरिकन स्पर्धा : २००६, २००९, २०१३

मिश्र दुहेरी (१०)

* ऑस्ट्रेलियन स्पर्धा : २००३, २०१०, २०१५

* फ्रेंच स्पर्धा : २०१६

* विम्बल्डन स्पर्धा : १९९९, २००३, २०१०, २०१५

* अमेरिकन स्पर्धा : २००८, २०१५