या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरबी लेपझिग संघाने अ‍ॅटलेटिको माद्रिदसारख्या बलाढय़ संघाचा २-१ असा पाडाव करत चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्य फे रीत धडक मारली. लेपझिगसारख्या छोटय़ा संघाने प्रथमच चॅम्पियन्स लीगच्या अंतिम चार जणांमध्ये स्थान मिळवले.

सामना संपायला अवघी दोन मिनिटे शिल्लक असताना बदली खेळाडू म्हणूने मैदानात उतरलेला अमेरिकेचा मध्यरक्षक टायलर अ‍ॅडम्स याने शानदार गोल झळकावत लेपझिग संघाला विजय मिळवून दिला. आता उपांत्य फेरीत लेपझिगला पॅरिस सेंट जर्मेनशी लढत द्यावी लागेल.

जर्मनीच्या लेपझिग संघाने स्पेनचा आघाडीवीर दानी ओल्मो याच्या गोलमुळे ५१व्या मिनिटाला आघाडी घेतली होती. मात्र विक्रमी रकमेवर करारबद्ध करण्यात आलेल्या जोआओ फेलिक्स याने पेनल्टीवर गोल करत ७१व्या मिनिटाला अ‍ॅटलेटिको माद्रिदला बरोबरी साधून दिली. २०१४ आणि २०१६मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या अ‍ॅटलेटिको माद्रिदकडून आणखी एका गोलची अपेक्षा होती. पण ११ वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या लेपझिगने बलाढय़ अ‍ॅटलेटिकोला पराभवाचा धक्का देत आगेकूच केली.

अ‍ॅडम्सचा हा लेपझिगसाठी पहिला गोल ठरला. तसेच चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीनंतर गोल करणारा अ‍ॅडम्स हा अमेरिकेचा पहिला फुटबॉलपटू ठरला.

मैदानात उतरल्यानंतर संघातील खेळाडूंमध्ये ऊर्जा निर्माण करण्याची गरज होती. त्याचबरोबर संघाच्या विजयात सर्वतोपरी प्रयत्न करण्याची आवश्यकता होती. माझ्याकडून गोल अनपेक्षित होता. पण गोल करण्यासाठी ओळखला जात नसून पहिला गोल झाल्याने तसेच संघाच्या विजयात योगदान दिल्याने मी आनंदी आहे.

-टायलर अ‍ॅडम्स

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leipzig beat a1 atletico for the first time in the semifinals abn
First published on: 15-08-2020 at 00:12 IST