भारताच्या सहज ग्रोव्हर व विदित गुजराथी यांनी अपेक्षेप्रमाणे आपला डाव बरोबरीत सोडविला आणि जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेत आव्हान राखले. तिसऱ्या फेरीत भारताच्या इव्हाना फुर्टाडोने आपल्यापेक्षा मानांकनात वरचढ असलेल्या पद्मिनी राऊत या भारतीय खेळाडूला बरोबरीत रोखले.
या स्पर्धेतील खुल्या गटात वेई येई, लुई शांगलेई (चीन), कोरी जॉर्ज (पेरू), व्लादिस्लाव्ह कोव्हालेव (बेलारुस), इदानी पौया (इराण) हे पाच खेळाडू प्रत्येकी तीन गुणांसह तिसऱ्या फेरीअखेर संयुक्त आघाडीवर आहेत. दुसऱ्या स्थानावर असलेल्या खेळाडूंमध्ये भारताच्या विदित, सहज, अंकित राजपारा, सुनीलदुध नारायण यांचा समावेश आहे. नारायणने रॉबिन व्हान काम्पेन याला बरोबरीत रोखून अनपेक्षित निकाल नोंदविला. मुलींमध्ये भारताच्या पद्मिनी, फुर्टाडो, प्रत्युषा यांचे प्रत्येकी अडीच गुण झाले आहेत.
ग्रोव्हर व गुजराथी यांच्यातील डावाबाबत उत्सुकता होती. दोन्ही खेळाडूंनी कल्पक चाली करीत डावात विजय मिळविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी ४० चालींमध्ये बरोबरी मान्य केली. या दोन्ही खेळाडूंचे प्रत्येकी अडीच गुण झाले आहेत.
भारताच्या दीप्तायन घोष याला तिसऱ्या फेरीत चीनच्या वेई येई याच्याविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.
पद्मिनी व फुर्टाडो यांच्यातील डाव ३३ चालींमध्ये बरोबरीत सुटला. दोन्ही खेळाडूंनी चांगली व्यूहरचना करीत डावावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला मात्र अखेर त्यांनी बरोबरी मान्य केली. भारताच्या प्रत्युषा बोड्डाने व्हिएतनामच्या निग्वेन थिमेई हिला ३४ चालींमध्ये बरोबरीत रोखून अनपेक्षित धक्का दिला.