लिओनेल मेस्सीचे निवृत्तीनंतर दमदार पुनरागमन; उरुग्वेवर विजय मिळवून अर्जेटिना गटात अव्वल
निवृत्तीच्या निर्णयाचा पुनर्विचार करून पुन्हा मैदानात उतरलेल्या लिओनेल मेस्सीने २०१८ साली रशियात होणाऱ्या फिफा विश्चषक स्पध्रेच्या पात्रता फेरीत अर्जेटिनाला विजय मिळवून दिला. अजूनही आपण जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे, असे ठणकावून सांगताना मेस्सीने उरुग्वेविरुद्ध गोल करत संघाला १-० असा विजय मिळवून दिला. मेंडोझा येथील मॅलव्हिनास अर्जेटिनास स्टेडियमवर झालेल्या या लढतीचे वर्णन ‘तो आला, त्याने जिंकलं’ असेच करावे लागेल. या विजयाबरोबर अर्जेटिनाने दक्षिण अमेरिका गटात सर्वाधिक १४ गुणांसह अव्वल स्थान पटकावले.
शतकमहोत्सवी कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेच्या अंतिम लढतीत चिलीकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर पुन्हा जेतेपदाने दिलेल्या हुलकावणीमुळे निराश झालेल्या मेस्सीने तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाने त्याचे चाहते, संघसहकारी दुखावले. त्याने अजून खेळत राहावे अशी चाहत्यांनी विनवणी केली. अर्जेटिनाचे नवे प्रशिक्षक एडगाडरे बौझा यांनी मेस्सीला निवृत्तीचा निर्णय बदलण्यासाठी केलेली शिष्टाई फळली. दोन महिन्यांनंतर पुरागमन करणाऱ्या मेस्सीने त्वरित गोल करून अर्जेटिनाला पहिल्या सत्रात आघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतर अर्जेटिनाला दहा खेळाडूंसह खेळावे लागले. त्यांच्या पाऊलो डिबालाला सामन्यातील दुसरे पिवळे कार्ड मिळाल्याने मैदान सोडावे लागले.
आक्रमणात लुईस सुआरेझ आणि एडिन्सन कवानी, तर बचावफळीची जबाबदारी सक्षमपणे पार पाडणारा कर्णधार डिएगो गॉडीन या मुरलेल्या खेळाडूंसह मैदानात उतरलेल्या उरुग्वेला मेस्सीने नि:शब्द केले. ३२व्या मिनिटाला एंजल डी मारियाने अर्जेटिनाला पहिली संधी मिळवून दिली, परंतु त्यावर गोल करण्यात त्यांना अपयश आले. उरुग्वेचा गोलरक्षक फर्नाडो मुस्लेराने अनेक प्रयत्न हाणून पाडत अर्जेटिनाच्या आक्रमणाची धार बोथट केली. मात्र, अनुभवी मेस्सीमुळे ४३व्या मिनिटाला फर्नाडोची अभेद्य भिंत डगमगली. मेस्सीने उरुग्वेच्या बचावपटूंना चकवत गोल करून अर्जेटिनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. अखेपर्यंत ही आघाडी कायम राखत अर्जेटिनाने सोपा विजय मिळवला.
मी कुणाला फसवले नाही- मेस्सी
‘‘राष्ट्रीय संघातून पुन्हा खेळताना आनंद होत आहे. मात्र, निवृत्तीचा निर्णय घेऊन मी कुणाची फसवणूक केली नाही, असे मला वाटते. कोपा अमेरिका स्पध्रेतील निकालानंतर आम्ही सर्व निराश झालो होतो, परंतु त्यानंतर मी खूप विचार केला. बौझा आणि मला नेहमी पाठिंबा देणाऱ्यांशी चर्चा केली. दुखापतीमुळे व्हेनेझुएलाविरुद्धच्या सामन्यात खेळेन की नाही, याची खात्री नाही,’’ असे मेस्सी म्हणाला.