फुटबॉल हा श्वास मानणाऱ्या अर्जेटिनात गळ्यातील ताईत असलेल्या लाडक्या लिओनेल मेस्सीचा विवाह म्हणजे अनेकांना घरचेच कार्य असल्याचे वाटत आहे. त्यामुळे ३० जूनला होणाऱ्या या सोहळ्याची जय्यत तयारी त्याच्या चाहत्यांनी सुरू केली आहे. या लग्नासाठी मेस्सीने योगायोग जुळवून आणला आहे. कारण आपल्या तिसाव्या वाढदिवशी त्याने विवाहबद्ध होण्याचे ठरवले आहे.

मेस्सी बालमैत्रीण अन्तोनेला रोकुझो हिच्याशी विवाहबद्ध होत आहे. लॅटिन अमेरिकन पद्धतीने हा समारंभ होणार आहे. कोलंबियाची पॉपगायिका शकिरा या समारंभास उपस्थित राहणार आहे. लुईस सोरेझ, नेयमार, सेझ फॅब्रिगास, झेवियर हर्नान्डेझ यांच्यासह अनेक दिग्गज फुटबॉलपटूंना निमंत्रित करण्यात आले आहे.

मँचेस्टर सिटी क्लबचा खेळाडू सर्जी अ‍ॅग्युरो याची पत्नी व अर्जेटिनाची गायिका कॅरिना ही स्वत: या सोहळ्यात गाणार आहे. मेस्सी हा एरव्ही येथील शहरात सामान्य नागरिकाप्रमाणे वावरत असला तरीही या सोहळ्याला अनेक राजकीय नेते उपस्थित राहण्याची शक्यता असल्यामुळे कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही केली जाणार आहे. स्पॅनिश डिझायनर रोझा क्लारा यांनी रोकुझो हिच्यासाठी खास पोशाख तयार केला आहे. त्याखेरीज पाहुण्यांकरिताही २० केशभूषातज्ज्ञांची व्यवस्था करण्यात आली आहे.

आपल्याला कोणतीही भेट न देता त्याएवढी रक्कम येथील अनाथ मुलांच्या संगोपनासाठी उभारण्यात आलेल्या निधीकरिता द्यावी, असे आवाहन मेस्सी व रोकुझो यांनी केले आहे. लिओ मेस्सी फाऊंडेशनद्वारे गेली काही वर्षे मेस्सी हा अनाथ मुलांच्या विकासाकरिता मदत करीत आहे.