अखेरच्या एकदिवसीय सामन्यात निर्भेळ विजय मिळवत भारताने बुधवारी झिम्बाब्वेला व्हाईटवॉश दिला. झिम्बाब्वेचे १२३ धावांचे माफक आव्हान भारताने एकही गडी न गमावता पार केले. के.एल. राहुल आणि फैझ फझल या सलामीच्या फलंदाजांनी अर्धशतके झळकावत भारताला विजय प्राप्त करून दिला. या दोघांनी अनुक्रमे ६३ आणि ५५ धावा केल्या. आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आलेल्या फैझ फजलने पदार्पणातच अर्धशतक झळकविण्याचा पराक्रम केला. फझलने ६१ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५५ धावांची खेळी रचली.
तत्पूर्वी याआधीच्या दोन्ही सामन्यांप्रमाणेच झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर शरणागती पत्कारली. त्यामुळे भारताला झिम्बाब्वेचा डाव डाव अवघ्या १२३ धावांत गुंडाळण्यात यश मिळाले. भारताकडून जसप्रीत बुमराहने प्रभावी मारा करत चार बळी मिळवले. या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाचा झिम्बाब्वेला फायदा घेता आला नाही. वुसी सिबांडाने संघातर्फे सर्वाधिक ३८ धावा केल्या. झिंबाब्वेचे अवघे चार फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले.