इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये गुरुवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात गतविजेत्या लिव्हरपूलला तब्बल ६८ सामन्यांनंतर प्रथमच घरच्या मैदानावर पराभव पत्करावा लागला. अ‍ॅश्ले बर्न्‍सने नोंदवलेल्या निर्णायक गोलच्या बळावर बर्नलेने लिव्हरपूलला १-० असे नमवले.

यापूर्वी एप्रिल २०१७मध्ये क्रिस्टल पॅलेसने लिव्हरपूलला अ‍ॅनफील्ड येथे २-१ असे पराभूत केले होते. त्यानंतर लिव्हरपूलने ५५ सामन्यांत विजय मिळवला, तर १३ लढतींमध्ये त्यांना बरोबरी पत्करावी लागली होती. परंतु ८३व्या मिनिटाला लिव्हरपूलचा गोलरक्षक अ‍ॅलिसन बेकरने पेनल्टी क्षेत्रात बर्न्‍सला पाडल्यामुळे बर्नलेला पेनल्टी बहाल करण्यात आली आणि बर्न्‍सनेच या संधीचे सोने करताना बर्नलेसाठी विजयी गोल साकारला.

या पराभवामुळे लिव्हरपूलला १९ सामन्यांतील ३४ गुणांसह चौथ्या स्थानीच समाधान मानावे लागले. स्पर्धेच्या मध्यावर मँचेस्टर युनायटेड सर्वाधिक ४० गुणांसह अग्रस्थानी विराजमान आहे. त्यामुळे आता उर्वरित १९ सामन्यांत अधिकाधिक विजय मिळवून लिव्हरपूल जेतेपद कायम राखण्यात यशस्वी होणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

बार्सिलोना, अ‍ॅटलेटिको माद्रिदचे विजय

ला लिगा फुटबॉल

माद्रिद : बार्सिलोनाने कोपा डेल रे चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवताना कॉर्नेल्ला संघाचा २-० असा पराभव केला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्यामुळे ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत सामन्याचा निकाल लागला. ओस्माने डेम्बेले (९२वे मिनिट) आणि मार्टिन ब्रेथवेट (१२०वे मिनिट) यांनी बार्सिलोनासाठी प्रत्येकी एक गोल केला. ला लिगा फुटबॉलमध्ये अग्रस्थानी असलेल्या अ‍ॅटलेटिको माद्रिदने ऐबरवर २-१ अशी मात केली. लुइस सुआरेझ अ‍ॅटलेटिकोच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने अनुक्रमे ४० आणि ८९व्या मिनिटाला दोन गोल नोंदवले. मार्को ड्रिमिकोव्हिचने (१२वे मिनिट) ऐबरसाठी एकमेव गोल केला. अ‍ॅटलेटिको १७ सामन्यांतील ४४ गुणांसह अग्रस्थानी आहे.

बायर्न म्युनिकच्या विजयात लेव्हांडोवस्की चमकला

बुंडेसलिगा फुटबॉल

बॅव्हरिया : गतवर्षी ‘फिफा’चा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावणाऱ्या रॉबर्ट लेव्हांडोवस्कीने १३व्या मिनिटाला पेनल्टीद्वारे केलेल्या एकमेव गोलच्या बळावर बायर्न म्युनिकने बुंडेसलिगा फुटबॉलमध्ये अग्सबर्गवर १-० अशी सरशी साधली. या विजयासह बायर्ननने (१७ सामन्यांत ३९ गुण) अग्रस्थानावरील आघाडी अधिक भक्कम केली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Liverpool lost after 68 matches abn
First published on: 23-01-2021 at 00:24 IST