गोलरक्षक डेव्हिडची उल्लेखनीय कामगिरी

मँचेस्टर युनायटेडने इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पध्रेतील कट्टर प्रतिस्पर्धी लिव्हरपूल क्लबला त्यांच्याच घरच्या मैदानावर गोलशून्य बरोबरीत रोखण्यात यश मिळवले. अभेद्य बचावाचे दर्शन घडवत युनायटेडने फॉर्मात असलेल्या लिव्हरपूलच्या सलग चार सामन्यांच्या विजयी मालिकेत खंड पाडला. घरच्या मैदानावरील या सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल असलेल्या मँचेस्टर सिटी आणि आर्सेनल यांना मागे टाकण्याची संधी लिव्हरपूलला होती. मात्र, त्यांना चौथ्या स्थानावरच समाधान मानावे लागले.

सामन्याच्या अखेरच्या मिनिटाला लिव्हरपूलला आघाडी घेण्याची संधी चालून आली होती, परंतु युनायटेडचा गोलरक्षक डेव्हिड डी गीआ त्यांच्या मार्गात आडवा आला. इम्रे कॅन आणि फिलिप कुटिन्हो यांनी युनायटेडची बचावफळी भेदून गोल करण्याच्या दिशेने कूच केली. कुटिन्होने गोलजाळीच्या दिशेने टोलावलेला चेंडू डेव्हिडने अप्रतिम झेप घेऊन अडवला आणि यजमानांना गोलशून्य बरोबरीवरच समाधान मानावे लागले. तत्पूर्वी झाल्टन इब्राहिमोव्हिकने  गोल करण्याचा प्रयत्न गमावल्याने पाहुण्यांची विजयाची संधी हुकली.

‘‘युनायटेडने गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या नाहीत. ते बचावात्मक खेळत होते.  डेव्हिडने दोन ते तीन अप्रतिम बचाव केले. मात्र, हा आम्हाला हवा असलेला निकाल नाही,’’ असे मत लिव्हरपूलचे प्रशिक्षक जुर्गेन क्लोप यांनी व्यक्त केले. या निकालानंतर युनायटेड सातव्या स्थानी कायम आहे. जोस मॉरिन्हो यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या युनायटेडला मागील पाच सामन्यांत  एकच विजय मिळवता आलेला आहे.

‘‘लिव्हरपूलच्या प्रेक्षकांकडून कायम निराशाजनक प्रतिक्रिया मिळते. आम्ही येथे यावे आणि लाजिरवाणा पराभव पत्करावा, असे येथील लोकांना वाटत होते, परंतु आम्ही तसे होऊ दिले नाही,’’ अशी प्रतिक्रिया मॉरिन्हो यांनी दिली.