लोढा समितीच्या शिफारशींमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) धाबे दणाणले आहेत. लोढा समितीच्या काही शिफारशी बीसीसीआयला रुचलेल्या नाहीत. ‘लोढा समितीच्या बऱ्याच शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे आम्ही ठरवले आहे. पण काही शिफारशींची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे फारच कठीण दिसत आहे. त्यासाठी आम्ही लोढा समितीकडे बैठकीसाठी वेळ मागितला होता, पण गेल्या दोन महिन्यांमध्ये त्यांनी आम्हाला वेळ दिलेला नाही,’ असे बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
‘ हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि आमचा भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे. आम्ही आतापर्यंत ८५ टक्के शिफारशींची अंमलबजावणी केली आहे, पण काही शिफारशी व्यवहार्य नाही, असे सदस्यांचे म्हणणे आहे. यामधून मार्ग काढण्यासाठी आम्ही लोढा समितीकडे बैठकीसाठी वेळ देण्याची विनंती केली होती, पण त्यांनी गेल्या दोन महिन्यांमध्ये आमच्या विनंतीचा विचारच केलेला दिसत नाही,’ असे ठाकूर म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, ‘बीसीसीआय ही सध्याच्या घडीला जगभरातील सर्वोत्तम संघटना आहे. त्यामुळे लोढा समितीच्या शिफारशी येण्यापूर्वीच आम्ही संघटनेमध्ये बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. बऱ्याच स्पर्धामध्ये भारतीय संघानेही चांगली कामगिरी केली आहे. आम्ही कसोटीमध्ये अव्वल स्थानी आहोत, त्याचबरोबर महिला आणि कनिष्ठ संघांचीही कामगिरी सरस होत आहे. त्यामुळे उणिवा नेमक्या कुठे आहेत? विनाकारण आमच्यावर दबाव आणला जात आहे.’
राजस्थान क्रिकेट संघटनेबाबत ठाकूर म्हणाले की, ‘ एका व्यक्तीमुळे या संघटनेला निलंबित करण्यात आले आहे, त्यामुळे राजस्थान क्रिकेट संघटनेतील व्यक्तींनीच योग्य निर्णय घ्यायला हवा. पण जोपर्यंत निलंबन आहे, तोपर्यंत त्यांना एकदिवसीय सामन्यांचे आयोजन करण्याचे हक्क दिले जाणार नाही.’