|| ऋषिकेश बामणे
आठवडय़ाची मुलाखत – चिराग शेट्टी, भारताचा बॅडमिंटनपटू
थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळवल्यामुळे एकेरीतील खेळाडूंचे यशापयश बाजूला सारून दुहेरीतील खेळाडूंकडेही विजेतेपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे कारकीर्दीतील खऱ्या कसोटीचा काळ आता सुरू होणार असून त्यासाठी मी पूर्णपणे सज्ज आहे, अशी आश्वासक प्रतिक्रिया भारताचा दुहेरीतील बॅडमिंटनपटू चिराग शेट्टीने व्यक्त केली.
मुंबईच्या २२ वर्षीय चिरागने सात्त्विकसाईराज रंकीरेड्डीच्या साथीने गेल्या आठवडय़ात ‘बीडब्ल्यूएफ’ सुपर ५०० स्पर्धा जिंकणारी भारताची पहिली पुरुष दुहेरी जोडी बनण्याचा मान पटकावला. गोरेगाव येथे उदय पवार यांच्या अकादमीत बॅडमिंटनचे धडे गिरवणाऱ्या चिरागशी या विजेतेपदाच्या निमित्ताने आणि कारकीर्दीतील आगामी आव्हानांविषयी केलेली ही खास बातचीत-
- विजेतपदानंतर तुझ्या काय भावना आहेत?
अंतिम फेरीत आम्ही जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या चीनच्या जोडीला पराभूत केले. ज्यावेळी अखेरचा गुण मिळवला तेव्हा आम्ही दोघेही कोर्टावरच आनंदाच्या भरात आडवे झालो. विजेतेपदानंतरचा आनंद अवर्णनीय होता. तो आनंद शब्दांत सांगणे कठीण आहे. या कामगिरीपासून प्रेरणा घेत नेहमीच विजयाच्या निर्धाराने कोर्टवर उतरेन.
- विजेतेपदानंतर तुमच्याकडून चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, त्याकडे तू कशा रीतीने पाहतो आहेस?
निश्चितच माझ्यासाठी आणि दुहेरीतील सर्व खेळाडूंसाठी ही एक मोठी संधी आहे. एकेरीतील खेळाडूंच्या अपयशामुळे आता चाहते आमच्याकडून प्रत्येक वेळी विजेतेपदाची अपेक्षा करतील, याची जाणीव आहे. परंतु याचा मी माझ्या खेळावर किंचितही फरक पडू देणार नाही. तूर्तास आगामी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद मिळवण्यासाठी मी तयारी करत असून त्यासाठीच हैदराबाद स्पर्धेतूनही विश्रांती घेण्याचा निर्णय मी आणि सात्त्विकने घेतला. त्याशिवाय, एकेरीतील खेळाडू लवकरच कामगिरीत सुधारणा करतील, अशी मला अपेक्षा आहे.
- सततच्या स्पर्धासाठी तंदुरुस्ती राखण्याकरिता तू किती मेहनत घेतोस?
थायलंड बॅडमिंटन स्पर्धेपूर्वी मी सलग दोन आठवडय़ांत दोन स्पर्धा खेळलो. परंतु त्यापूर्वी जवळपास एक महिना विश्रांतीचा काळ होता. त्यादरम्यान मी बॅडमिंटनच्या सरावाव्यतिरिक्त रोज सकाळी धावणे, व्यायाम आणि योगासन करण्यावरही भर दिला. त्यामुळे गेल्या एक महिन्यात सतत खेळताना तंदुरुस्ती टिकवण्यात मला फार अडचण जाणवली नाही. प्रशिक्षक आणि सरावतज्ज्ञांच्या साहाय्यामुळे हे शक्य झाले. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांत प्रशिक्षकांचीही अनेकदा अदलाबदल झाली. त्यामुळे फावल्या वेळेत प्रशिक्षकांसोबत वेळ घालवून त्यांच्या सल्ल्यानुसार माझ्या खेळात आवश्यक ते बदल करण्यावर मी भर देतो.
- टोक्यो ऑलिम्पिकसाठी खास तयारी सुरू केली आहे का?
तूर्तास तरी मी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेवरच लक्ष केंद्रित केले आहे. पण टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक मिळवण्याचे स्वप्न नक्कीच आहे. ऑलिम्पिक पात्रतेचा काळ सुरू असल्यामुळे प्रत्येक स्पर्धेत कशा प्रकारे स्वत:चे १०० टक्के योगदान देता येईल, यावरच मी लक्ष देत आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू किती पदके मिळवतील, हे मी खात्रीपणे सांगू शकत नाही. पण दुहेरीतील खेळाडू निश्चितच पदक पटकावतील, अशी मला अपेक्षा आहे.
- भारतातील बॅडमिंटनच्या पायाभूत सुविधांविषयी तुझे काय मत आहे?
भारतातील युवा पिढी आता मोठय़ा प्रमाणावर बॅडमिंटनकडे वळत आहे. एकेरीतील खेळाडूंचे यामध्ये सर्वाधिक योगदान आहे. परंतु गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत जवळपास एक हजारपेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. इंडोनेशिया, चीन यांसारख्या देशांमध्ये जे खेळाडू स्वत:चे कौशल्य दाखवतात, त्यांना वरच्या स्तरावर चमकण्याची संधी मिळते, ही प्रणाली भारतातही राबवायला हवी, असे मला वाटते.
- कारकीर्दीतील आतापर्यंतच्या वाटचालीत कोणाचे सर्वाधिक योगदान लाभले?
माझे पहिले गुरू म्हणजे वडील चंद्रशेखर शेट्टी. त्यांच्या पाठिंब्याशिवाय मी स्वप्नातही इथवर मजल मारू शकलो नसतो. त्याशिवाय उदय पवार, पुलेला गोपीचंद, फ्लँडी लिम्पेले आणि टॅन किम हर यांसारख्या प्रशिक्षकांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केले. लाल मातीचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा टेनिसपटू राफेल नदाल माझे प्रेरणास्थान असून त्याची आक्रमक शैली आणि अखेरच्या क्षणापर्यंत लढण्याची जिद्द मला नेहमीच प्रोत्साहन देते.