धनंजय रिसोडकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राही सरनोबत, अर्जुन पुरस्कार

नेमबाज अंजली भागवत यांनी घालून दिलेल्या पायाला कळसापर्यंत न्यायचे कार्य राही सरनोबतने करून दाखवले आहे. राष्ट्रकुलमध्ये दोन सुवर्ण, एक रौप्य, आशियाईत एक सुवर्ण, एक कांस्य आणि विश्वचषक नेमबाजीतदेखील एक सुवर्ण आणि एक कांस्य अशी पदकांची चढत्या क्रमाने लयलूट करणाऱ्या राहीच्या खात्यावर केवळ ऑलिम्पिक पदकाचीच उणीव आहे. त्यामुळेच आशियाईत सुवर्णपदक पटकावल्यानंतर आणि अर्जुन पुरस्कार जाहीर होऊनदेखील त्यातच समाधान मानण्यास ती तयार नाही. जगभरातील कोणत्याही खेळाडूच्या दृष्टीने सर्वोच्च प्रतिष्ठा ही ऑलिम्पिक पदकालाच असते, हे ज्ञात असल्यामुळेच राहीच्या निशाण्यावर आता केवळ टोकियो ऑलिम्पिक आहे. २०२०च्या ऑलिम्पिकचे पदक हेच एकमेव ध्येय ठरवून राहीची वाटचाल सुरू आहे.

शाळेमध्ये अत्यंत सामान्य विद्यार्थिनी असलेल्या राहीच्या जीवनप्रवासाला इतकी मोठी कलाटणी मिळेल, अशी अपेक्षा तिच्या घरच्यांनाच नव्हे, तर तिलादेखील वाटत नव्हती. शाळेत तर राहीला एनसीसीमध्येदेखील प्रवेश मिळाला नव्हता. त्यामुळे लहानपणापासून बंदुकीचे आकर्षण असूनही शालेय जीवनात कधी बंदूक हाताळायलादेखील मिळाली नव्हती. परंतु नेमबाजीचे खासगी प्रशिक्षण दिले जाते, एवढेच तिला समजले होते. त्यामुळे दहावीच्या परीक्षा संपल्यानंतर लगेचच तिने नेमबाजीच्या शिबिरात नाव नोंदवले. तिथेदेखील रायफल नेमबाजीचे शुल्क पिस्तूल नेमबाजीपेक्षा जास्त असल्याने राहीने पिस्तूलच निवडले आणि ते पिस्तूलच जणू तिच्या हाताचा अविभाज्य भाग बनून गेले. २००६ पासून सुरू झालेला प्रशिक्षणाचा टप्पा पुढे-पुढे सरकत जिल्हा, राज्य करत अवघ्या चार वर्षांत ती २५ मीटर पिस्तूल नेमबाजीतील देशातील अव्वल खेळाडू बनली. २०१० मध्ये दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत दुहेरी गटात सुवर्णपदक मिळवत राहीने तिच्या आगमनाची दखल घेणे सर्वाना भाग पाडले. २०११ साली अमेरिकेत झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करीत आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवण्यास प्रारंभ केला. या कामगिरीमुळेच राहीला २०१२ सालच्या ऑलिम्पिकची पात्रतादेखील लाभली. मात्र ऑलिम्पिकसारख्या सर्वाधिक मोठय़ा स्पर्धेचे दडपण हाताळणे तिला काहीसे अवघडच गेले. परंतु या अपयशाची भरपाई तिने २०१३ साली दक्षिण कोरियात झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेतील सुवर्णपदकाने भरून काढले. दरम्यानच्या काळात झालेल्या दुखापतीचा सामना करीत तिने दोन पदके पटकावली. २०१४ साली इन्चॉन आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य तसेच ग्लासगोतील राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करीत संपूर्ण वर्ष गाजवले. मग काळात हाताच्या दुखापतीने खूप सतावल्याने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकची पात्रतादेखील तिला गाठता आली नाही. २०१६च्या प्रारंभापासून जवळपास दीड वर्ष खेळापासून लांब राहावे लागले. अखेरीस २०१७च्या उत्तरार्धात राहीने जर्मनीच्या विश्वविजेत्या नेमबाज मुन्खबयार दोरसुरेन यांना वैयक्तिक प्रशिक्षक म्हणून नेमत पुन्हा जोमाने प्रशिक्षणास प्रारंभ केला. दीड वर्ष खेळापासून लांब राहिल्याने आत्मविश्वास पूर्णपणे डळमळीत झाला होता. तो आत्मविश्वास पुन्हा मिळवून देतानाच मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा भक्कम बनण्यावरदेखील राहीने भर दिला. त्यामुळेच यंदा पालेमबंगमध्ये आशियाईचे सुवर्णपदक पटकावल्यानंतर तिने हे पदक मुन्खबयार यांना समर्पित केले. आता केवळ ऑलिम्पिक हेच एकमेव लक्ष्य ठेवणाऱ्या राहीला अर्जुन पुरस्काराद्वारे अर्जुनाप्रमाणेच एकाग्रतेचे बळ लाभून ‘लक्ष्यभेद’ साधता यावा, हीच क्रीडारसिकांची अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta soprt interview rahi sarnobat
First published on: 23-09-2018 at 01:15 IST