आठवडय़ाची मुलाखत: सुनीत जाधव, भारत-श्री शरीरसौष्ठवपटू

सलग चार वेळा महाराष्ट्राचे जेतेपद, सलग दोन वेळा राष्ट्रीय जेतेपद मिळवत शरीरसौष्ठवपटू सुनीत जाधवने गेल्या काही वर्षांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली असली तर शासकीय नोकरीची त्याची प्रतीक्षा मात्र अद्याप संपलेली नाही.

खेळासाठी अथक मेहनत तर सुनीत घेतोच, पण काही केल्या पैशाचे सोंग आणता येत नाही. सध्यातरी खासगी प्रशिक्षण देत सुनीत आपला उदरनिर्वाह चालवत आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाच २०१४पासून तो शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. पण आतापर्यंत फक्त आश्वासनांचेच गाजर त्याला मिळत आहे. चांगली नोकरी मिळाल्यास मी जागतिक दर्जावरही चांगली कामगिरी करू शकतो, असे मत सुनीतने व्यक्त केले. त्याचबरोबर राष्ट्रीय जेतेपद पटकावण्यासाठी घेतलेली मेहनत, व्यायाम, आहार आणि भविष्यातील स्वप्न, अशा बऱ्याच गोष्टी त्याने या खास मुलाखतीमध्ये व्यक्त केल्या.

  • सलग दुसऱ्यांदा तू राष्ट्रीय स्पर्धा जिंकली, याबद्दल काय सांगशील?

सलग दुसऱ्या विजेतेपदाने समाधानी तर आहेच. सर्वात आनंद या गोष्टीचा आहे की, मला या स्पर्धेत बऱ्याच राज्यांतल्या शरीरसौष्ठवपटूंनी लक्ष्य केले होते. माझ्या प्रत्येक हालचालींवर त्यांचे लक्ष होते. पण मी यावेळी खास रणनीती आखली होती. त्यानुसार मी शरीराची जडणघडण घडवत गेलो आणि जेतेपद पटकावले.

  • या स्पर्धेसाठी काय विशेष रणनिती ठरवली होती का?

गेल्या वर्षी जेतेपद पटकावल्यावर मी लगेचच यावर्षीच्या स्पर्धेच्या तयारीला सुरुवात केली होती. माझ्यामध्ये काही कच्चे दुवे होते, त्यावर मेहनत घेतली. स्पर्धेच्या पूर्वी आणि स्पर्धेदरम्यान शरीर नेमके कसे असायला हवे, याचा सखोल अभ्यास केला. त्यानुसार मी व्यायाम आणि आहार घेत गेलो. त्याचबरोबर शरीर कसे संतुलित ठेवता येईल, यावर जास्त भर दिला.

  • किती वेळ व्यायाम करतोस. याचप्रमाणे कसा आणि किती आहार घेतोस?

दिवसातून सकाळी आणि संध्याकाळी दोन तास व्यायाम करत होतो. स्पर्धे वेळी व्यायामावर अधिक जास्त लक्ष केंद्रित करतो. आहाराबाबतीत म्हणायचे तर मी दिवसाला एक किलो चिकन आणि ४० अंडय़ांचा मुख्य आहार घेतो. सर्वानाचा हा आहार मानवेल, असे नाही. त्यासाठी आहारतज्ज्ञाचीही मदत घ्यावी लागते. त्याचबरोबर फळे आणि भाज्या यांचाही आहारामध्ये समावेश असतो. खरे तर हा खर्च माझ्यासारख्या सामान्य घरातल्या मुलाला परवडणारा नाही. घरच्यांनी सुरुवातीला मदत केली. पण आपणच हा महागडा छंद जोपासला असल्यामुळे मी त्यांच्याकडून आर्थिक मदत घेणे बंद केले. मी काही नामांकित व्यक्तींना मार्गदर्शन करतो, हेच माझ्या उत्पन्नाचे साधन आहे. पण स्पर्धा जवळ आल्यावर त्यांना वेळ द्यायला मला जमत नाही. त्यावेळी हे उत्पन्नाचे साधन बंद होते. त्यानंतर जमवलेले पैसे शरीरावर खर्च करतो. सरतेशेवटी हातामध्ये काहीच राहत नाही.

  • तू नोकरीसाठी काही प्रयत्न केलेस का?

एकामागून एक महाराष्ट्र-श्री स्पर्धा जिंकत असताना शासकीय नोकरीसाठी मी २०१४ साली विचारणा केली होती. क्रीडा मंत्री आणि मुख्यमंत्री यांचीही भेट घेतली. त्यांनी मला आश्वासन दिले. पण नोकरी मिळाली तर माझ्या मागचा आर्थिक गणिताचा ससेमिरा सुटेल आणि आर्थिक जुळवाजुळव करण्याचे दडपण न घेता मी स्पर्धावर लक्ष केंद्रित करू शकेन.

  • यापुढे तू कोणते ध्येय डोळ्यांपुढे ठेवले आहेस?

मुंबई, महाराष्ट्र आणि राष्ट्रीय स्पर्धा मी जिंकल्या आहेत. आता मला जागतिक स्पर्धेचे जेतेपद खुणावते आहे. त्यासाठी मी आतापासून विशेष तयारी करायला सुरुवात केली आहे. पण जर आर्थिक पाठबळ नसेल तर या स्पर्धेत भाग घेणे कठीण वाटते. नोव्हेंबरमध्ये जागतिक स्पर्धा होणार आहे, त्यापूर्वी नोकरी मिळाली तर नक्कीच माझा आत्मविश्वास उंचावण्यासाठी मदत होईल.