अमेरिकन ऑलिम्पिक समितीने २०२४च्या ऑलिम्पिकसाठी बोस्टनऐवजी लॉस एंजलिस शहराचे नाव पुढे केले आहे. या शहराने यापूर्वी दोन वेळा या स्पर्धेचे यजमानपद भूषवले आहे.
‘‘आम्हाला पुन्हा ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी या शहराने प्रेरणा दिली आहे. ऑलिम्पिकसाठी कोणतीही गुंतवणूक करताना येथील नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य दिले जाईल,’’ असे समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्कॉट ब्लॅकमुन यांनी ही घोषणा करताना सांगितले.
‘‘जगातील मोठय़ा शहरांमध्ये या शहराचे नाव आहे. येथे पुन्हा एकदा ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केली जावी हे नागरिकांचे स्वप्न आहे. त्यामुळे संयोजनपदाचा प्रस्ताव सादर करताना येथील नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी मला खात्री आहे,’’ असे महापौर एरिक गार्सेटी यांनी सांगितले.
बोस्टन शहराचा ऑलिम्पिक संयोजनासाठी प्रस्ताव सादर केला जाणार होता, मात्र तेथील अनेक नागरिकांचा त्याला विरोध होता. नियमित कर भरणाऱ्या नागरिकांचा त्यामध्ये समावेश होता. लॉस एंजलिस येथे १९३२ व १९८४ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले होते. दोन्ही वेळी अतिशय भव्य स्वरूपात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती व दोन्ही वेळा संयोजन समितीला आर्थिक फायदा झाला होता. २०२४च्या संयोजनासाठी रोम, पॅरिस, हॅम्बर्ग, बुडा पेस्ट आदी शहरे उत्सुक आहेत. २०१७ मध्ये संयोजन शहराचे नाव निश्चित होणार आहे.
अंदाजपत्रकापेक्षा जास्त खर्च होणार का, हीच शहराच्या नागरिक समितीपुढे समस्या निर्माण झाली होती. मात्र या समितीचे अध्यक्ष हर्ब वेसॉन यांनी ऑलिम्पिकरिता होणारा खर्च भरून काढण्यासाठी लोकांवर कोणताही कर आकारला जाणार नाही असे आश्वासन दिले. त्यानंतर समितीने शहराच्या प्रस्तावास मान्यता दिली. सार्वजनिक व खासगी स्रोतांद्वारे या खर्चासाठी निधी उभारला जाणार आहे.
समितीचे सदस्य पॉल क्रकोरियन यांनी सांगितले, ‘‘आम्हाला संयोजनपद मिळेल असा मला विश्वास आहे. या स्पर्धेसाठी सामान्य नागरिकांवर कोणताही आर्थिक भार टाकला जाणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत.’’
ऑलिम्पिक स्पर्धेच्या संयोजनामुळे संयोजक देश आर्थिक अडचणीत सापडला जातो, असा आजपर्यंत अनेक वेळा अनुभव पाहावयास मिळाला आहे. २०१४ मध्ये सोची येथे हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमुळे रशियापुढे आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. संयोजनपदासाठी १५ सप्टेंबपर्यंत रीतसर प्रस्ताव सादर करावयाचा आहे.