अनेक सामन्यांचे फिक्सिंग केल्याचा कबुलीजबाब न्यूझीलंडचा क्रिकेटपटू लो व्हिन्सेंटने दिला. त्यानंतर त्याच्यावर आजीवन बंदीची कारवाई करण्यात आली आहे. यात कोलकाता नाइट रायडर्सच्या एका सामन्याचाही समावेश आहे.
न्यूझीलंडकडून २३ कसोटी आणि १०२ एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या व्हिन्सेंटने आपण मॅच-फिक्सिंगसंदर्भात पैसे घेतल्याची कबुली दिली. इंग्लंडमधील सामन्यांप्रमाणेच भारतातील आयपीएल आणि चॅम्पियन्स लीग सामन्यांचाही यात समावेश आहे.
इंग्लिश काऊंटी क्रिकेट स्पर्धेत त्याने केलेल्या मॅच-फिक्सिंगबद्दल इंग्लिश व वेल्स क्रिकेट मंडळाने त्याच्यावर आजीवन बंदी घातली आहे. काऊंटी स्पर्धेत २००८ ते २०११ या कालावधीत त्याचा मॅच-फिक्सिंग प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. एकूण १८ प्रकरणांमध्ये तो दोषी आढळला आहे.
व्हिन्सेंट याने एक पत्रक काढून त्याद्वारे आपल्या गैरकृत्याची कबुली दिली. ‘‘व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून खेळताना आपण अनेक वेळा मॅच-फिक्सिंगबद्दल भरपूर पैसे मिळविले. मात्र एवढी वर्षे मी याबद्दल एकही शब्द उच्चारला नाही. मी माझ्या न्यूझीलंड क्रिकेट संघाला तसेच साऱ्या जगास फसविले आहे. मी माझ्या देशाची प्रतिष्ठा धुळीस मिळविली आहे. याचा मला आता पश्चात्ताप झाल्यामुळेच मी या गुन्ह्य़ाची जाहीर रीत्या कबुली देत आहे,’’ असे व्हिन्सेंटने म्हटले आहे.
व्हिन्सेंटने हा जाहीर खुलासा केल्यानंतर लगेचच इंग्लिश व वेल्स क्रिकेट मंडळानेही त्याच्यावर काऊंटी कराराच्या नियमावलींचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवत त्याला काऊंटी स्पर्धेत भाग घेण्यास आजीवन बंदी घातली आहे.
लँकशायर व डरहॅम यांच्यात जून २००८मध्ये झालेल्या सामन्यात व्हिन्सेंटने चार वेळा नियमांचे उल्लंघन केले. २०११ मध्ये ससेक्स व लँकशायर तसेच ससेक्स व केंट यांच्यात झालेल्या सामन्यांच्या वेळी त्याने मॅच-फिक्सिंग केले असल्याचे निष्पन्न झाले आहे. चॅम्पियन्स लीग स्पर्धेतही त्याने असे गैरकृत्य केल्यामुळे त्याला या स्पर्धेतही सहभागी होण्यावर बंदी घालण्यात आली आहे. व्हिन्सेंट याने बांगलादेश क्रिकेट लीगमध्येही असे कृत्य केले असल्याचे दिसून आले आहे. आयपीएल स्पर्धेत खेळताना त्याच्याशी काही सट्टेबाजांनी संपर्क साधला होता, अशी कबुली त्याने दिली आहे.