धरमशाला:कर्णधार ऋषभ पंतच्या निराशाजनक कामगिरीचीच लखनऊ सुपर जायंट्स संघाला चिंता असून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आज, रविवारी त्यांच्यासमोर पंजाब किंग्जचे आव्हान असेल. ‘प्ले-ऑफ’च्या शर्यतीत कायम राहण्यासाठी लखनऊला विजय महत्त्वाचा ठरणार आहे.
गतहंगामात कोलकाता नाइट रायडर्सचे यशस्वी नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरने यंदा पंजाब किंग्जचा कर्णधार म्हणूनही चमकदार कामगिरी केली आहे. तसेच नेतृत्वाचा त्याच्या फलंदाजीवर कोणताही विपरीत परिणाम होत नसल्याचेही दिसून आले आहे. गेल्या सामन्यात त्याने हंगामातील चौथे अर्धशतक साकारताना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पंजाब संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
एकीकडे श्रेयस कर्णधार आणि फलंदाज म्हणून यश मिळवत असताना, दुसरीकडे पंत मात्र दोनही आघाड्यांवर झगडताना दिसत आहे. फलंदाजीत त्याला १० सामन्यांत केवळ एक अर्धशतक करता आले आहे. तसेच कर्णधार म्हणून गोलंदाजांची निवड आणि क्षेत्ररक्षकांची रचना यातही तो चुका करताना दिसत आहे. त्यामुळे काही सामन्यांपूर्वी अव्वल चारमध्ये असणारा लखनऊ संघ आता सहाव्या स्थानी घसरला आहे. ‘प्ले-ऑफ’ पात्रतेसाठी त्यांना उर्वरित चारपैकी तीन सामने जिंकावे लागू शकतील.
धरमशालात सामना
नयनरम्य अशा धरमशाला येथे यंदाच्या हंगामात हा पहिला सामना रंगणार आहे. धरमशालाच्या स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. ‘आयपीएल’मध्ये येथील सरासरी धावसंख्या १८० हून अधिक आहे. त्यामुळे सामन्यात मोठी धावसंख्या पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
वेळ : सायं. ७.३० वा. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओहॉटस्टार ॲप.