सलामीवीर हर्षद खडीवाले याच्या शतकापाठोपाठ अंकित बावणे यानेही शतक झळकावित कर्नाटकविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात महाराष्ट्रावरील डावाच्या पराभवाची नामुष्की टाळली, मात्र त्यांना निर्णायक पराभव टाळता आला नाही. कर्नाटकने हा सामना आठ गडी राखून जिंकला.
गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यातील पराभवामुळे महाराष्ट्रास ‘ब’ गटात शेवटचे स्थान मिळाले व त्याबरोबरच पुढील वर्षीच्या रणजी लढतींकरिता ‘क’ गटात खेळण्याची नामुष्की महाराष्ट्रावर आली. कर्नाटकने या सामन्यात सहा गुणांची कमाई केली.
पहिल्या डावात ४७३ धावांनी पिछाडीवर असलेल्या महाराष्ट्राने २ बाद ३१५ धावांवर दुसरा डाव पुढे सुरु केला. महाराष्ट्र डावाचा पराभव टाळणार की नाही हीच उत्सुकता होती. तिसऱ्या दिवशी खडीवाले याने शैलीदार १३६ धावांसह संग्राम अतितकर (७८) याच्या साथीत १५६ धावांची व बावणेच्या साथीत १४६ धावांची भागीदारी करीत भक्कम सुरुवात केली होती. बावणे याने कर्णधार रोहित मोटवानीबरोबर डाव पुढे सुरु केला. महाराष्ट्राकडून शेवटच्या दिवशी मोठी भागीदारी झाली नाही तरीही बावणे याला मधल्या व शेवटच्या फळीतील फलंदाजांनी साथ दिल्यामुळेच महाराष्ट्रास दुसऱ्या डावात ५६१ धावांचा पल्ला गाठता आला. बावणे याने झुंजार खेळ करीत नाबाद १५५ धावा करताना २४ चौकार व एक षटकार अशी फटकेबाजी केली. त्याला मोटवानी (२१), प्रयाग भाटी (२४), केदार जाधव (३४), राहुल त्रिपाठी (२९), श्रीकांत मुंढे (२८) यांची चांगली साथ मिळाली.
महाराष्ट्राने कर्नाटकपुढे विजयासाठी ८९ धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान त्यांनी ११.४ षटकांतच पार केले. त्याचे श्रेय राहुल लोकेश याने पाच चौकारांसह केलेल्या नाबाद ४२ धावांना द्यावे लागेल.
संक्षिप्त निकाल : कर्नाटक-९ बाद ५७२ घोषित व २ बाद ९२ (राहुल लोकेश नाबाद ४२) महाराष्ट्र-९९ व ५६१ (हर्षद खडीवाले १३६, संग्राम अतितकर ७८, अंकित बावणे नाबाद १५५, रोहित मोटवानी २१, प्रयाग भाटी २४, केदार जाधव ३४, राहुल त्रिपाठी २९, श्रीकांत मुंढे २८, एच.शरथ ४/१००, अभिमन्यु मिथुन ३/१२२)