स्पध्रेला उद्घाटनापूर्वीच गालबोट; प्रकार घडला नसल्याचा आयोजकांचा दावा
महाराष्ट्र केसरी कुस्ती ही भारतातील मानाची समजली जाणारी स्पर्धा आहे. वर्षभर मल्ल या स्पर्धेची उत्सुकतेने वाट पाहात असतात. पण यावर्षी उद्घाटनापूर्वीच स्पर्धेला गालबोट लागले ते उत्तेजकांचे. स्पर्धेपूर्वी स्टेडियमबाहेर दोन मल्लांनी स्टेडियम परिसरात उत्तेजक घेतल्याचे उघडकीस आले आहे. या दोघांना पकडण्यात आले असले तरी त्यांच्याबाबत कोणतीही माहिती देण्यास महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि नागपूर जिल्हा कुस्तीगीर या आयोजकांनी नकार दिला आहे. याउलट असा कोणताच प्रकार घडला नसल्याचा दावा आयोजक करत आहेत. यामुळे आयोजकच उत्तेजक घेतलेल्या मल्लांना पाठीशी घालत असल्याची चर्चा कुस्ती वर्तुळामध्ये आहे.
उत्तेजकाचे प्रकरण उघडकीस येऊनही कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र असे काहीही घडले नसल्याचे सांगून या मल्लांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्तेजक द्रव्य घेतल्यानंतर मल्लांची तपासणी करणारी यंत्रणा कुस्तीगीर परिषदेकडे नसल्याचे उघड झाल्यामुळे त्यांची तपासणी कशी करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
तब्बल २८ वर्षांनी नागपूरमध्ये ही स्पर्धा भरवण्यात आली असून राज्यातील विविध सातशेच्या वर मल्ल नागपुरात पोहोचले. डॉ. दीपक खिरवडकर हे स्टेडियम परिसरात असताना त्यांना स्टेडियमबाहेर दोन मल्ल दिसले आणि त्यांच्याजवळ दोन उत्तेजकांच्या सीरिंज दिसल्यामुळे त्यांनी त्या ताब्यात घेऊन स्पर्धेच्या तांत्रिक अधिकाऱ्याकडे आणून त्यांच्याही निदर्शनास आणून दिले.
ज्या दोघांनी उत्तेजक द्रव्य घेतले ते स्पर्धेच्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळताच आयोजकांपैकी एका पदाधिकाऱ्याने त्यांना पकडले. मात्र त्यानंतर त्या दोघांना कुठे नेले, ते कोण होते, कुठल्या शहराचे होते, ही माहिती संघटनेने बाहेर येऊ न देता, असे काहीही घडलेच नसल्याचे सांगितले. दोन मल्लांनी उत्तेजक द्रव्य घेतल्याचे सकाळी उघडकीस आल्याचे कळताच राज्यातील मल्लांचा निवास असलेल्या आमदार निवासात आणि मैदानात खळबळ उडाली.

तपास यंत्रणा नाही
कुस्ती स्पर्धेच्या दरम्यान मल्लांनी उत्तेजक द्रव्य घेतले असेल तर त्यांची तपासणी करणारी यंत्रणा कुस्तीगीर परिषदेकडे नसल्याचे उघड झाले आहे. या संदर्भात त्यांनी राज्य सरकारकडे मागणी केली होती. मात्र त्या संदर्भात कुठलाच निर्णय घेण्यात आला नाही. या संदर्भात दीपक गुंड म्हणाले, रोह्यमध्ये झालेल्या कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत उत्तेजक द्रव्य घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे या स्पर्धेदरम्यान तसे लक्षात आले तर संबंधितांवर बंदी घालण्यात येईल. राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधविरोधी संघटना (नाडा) या संस्थेकडून ही तपासणी केली जाते. त्यासाठी प्रत्येक खेळाडूच्या मागे १० ते १२ हजार रुपये खर्च आहे. त्यामुळे सर्वाची तपासणी करतो म्हटले तर १२ ते १५ लाख रुपये लागतील आणि इतका निधी परिषदेकडे नसल्याचे ते म्हणाले.
या मल्लांनी उत्तेजक द्रव्य घेतल्याची कुठलीच घटना उघडकीस आलेली नाही आणि राज्यातील मल्ल असे करणार नाहीत. दोन सीरिंज सापडल्या आहेत, मात्र त्या मल्लांनी घेतल्या आहेत की काय ते कळू शकले नाही. ज्या मल्लांनी उत्तेजक द्रव्य घेतले अशांवर कारवाई केली जाईल. मात्र, तूर्तास असे काहीही घडलेले नाही.
– दीपक गुंड, तांत्रिक अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय पंच