तामिळनाडू सरकारने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला ५० लाख रुपयांनी सन्मानित केले. स्क्वॉशपटूंसाठी पूर्णवेळ फिजिओ तसेच व्यायामशाळा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्क्वॉश रॅकेट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे कार्यालयही चेन्नईतच आहे. असे प्रोत्साहन महाराष्ट्रात मिळत नाही, अशी खंत आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता पुरुष स्क्वॉश संघातील खेळाडू महेश माणगावकरने व्यक्त केली. सीसीआय येथे आयोजित वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर तो बोलत होता.  
तो पुढे म्हणाला, ‘‘राज्याची स्क्वॉश संघटनाच नसल्याने आमच्या हक्कांसाठी लढणारे कोणीच नाही. राष्ट्रीय स्पर्धेसाठीसुद्धा ऑनलाइन माध्यमातून प्रवेशिका पाठवल्या जातात. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या राज्यातील खेळाडूंना राज्य सरकारतर्फे विशिष्ट निधी देण्यात आला. या यादीत माझे नावच नव्हते. त्यासाठी सरकारकडे निवेदन सादर करणे आवश्यक असते. मात्र या प्रक्रियेची कल्पना देण्यासाठी कोणतीच व्यवस्था आपल्याकडे नाही. त्याचा मला फटका बसला. आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या निमित्ताने तसेच सरावासाठी मी राज्याबाहेर असतो. त्यामुळे या निधीपासून मी दूरच राहिलो.’’
‘‘सार्वजनिक स्क्वॉश कोर्ट्सची उपलब्धता हा मुद्दा सार्वत्रिक आहे. मात्र राज्यात सक्षम मार्गदर्शन करू शकणाऱ्या प्रशिक्षकांचीच कमतरता आहे. राष्ट्रीय विजेता होणे तसेच देशांतर्गत क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्यासाठीच मुंबईत होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार आहे,’’ असे महेशने स्पष्ट केले.
‘‘यंदा माझी कामगिरी चांगली झाली आहे, मात्र सौरव घोषाल आणि हरिंदरपाल सिंग संधू यांच्याप्रमाणे कामगिरीत सातत्य आणायचे आहे. पुढच्या वर्षी जागतिक क्रमवारीत अव्वल पन्नासमध्ये स्थान मिळवायचे आहे. देशात सुरू झालेल्या चॅलेंजर स्पर्धेमुळे युवा खेळाडूंना लहान वयात आंतरराष्ट्रीय खेळाडूंविरुद्ध खेळता येईल आणि क्रमवारीच गुणही मिळतील,’’ असे महेशने सांगितले.
सीसीआयतर्फे वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा
क्रिकेट क्लब ऑफ इंडियातर्फे ६२वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा तसेच ७१व्या वेस्टर्न इंडिया कनिष्ठ खुल्या स्क्वॉश स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या संघातील सौरव घोषालला अव्वल मानांकन देण्यात आले असून, या संघातील सदस्य मुंबईकर महेश माणगावकरला द्वितीय तर हरिंदरपाल सिंग संधूला तृतीय मानांकन देण्यात आले आहे. महिलांमध्ये जोश्ना चिनप्पाला अग्रमानांकन देण्यात आले आहे. ३ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. कनिष्ठ स्पर्धा १९, १७, १५, १३, ११, ९ वर्षांखालील गटात मुलामुलींसाठी होणार आहे.