ज्ञानेश भुरे, लोकसत्ता

पुणे : पुणे हे शिक्षणाचेच नाही, तर आता खेळाचेही माहेरघर आहे. अद्ययावत क्रीडा संकुल येथे आहे, क्रीडा आंतरराष्ट्रीय विद्यापीठही उभे राहात आहे, ऑलिम्पिक भवनाचीही पायाभरणी झाली आहे. आता महाराष्ट्र राज्य क्रीडाक्षेत्रात मागे राहणार नाही. हे सर्व करत असतानाच राज्याच्या  क्रीडा संचालनालयाचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शी करण्यावर भर देऊ, असे आश्वासन राज्य क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

ऑलिम्पिक भवनाच्या पायाभरणी समारंभानंतर बनसोडे यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधला. ‘‘क्रीडा संचालनालयाचा कारभारावर लक्ष देत असताना क्रीडा अधिकाऱ्यांविषयी अनेक तक्रारी येत आहेत. या संदर्भात माहिती घेणे आणि चौकशी करण्याचे काम शासकीय पातळीवर सुरू आहे. यात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल. खेळाडू मैदानावर प्रावीण्य मिळवत असताना त्यांना शासन दप्तरी त्रास होणार असेल, तर तो खपवून घेतला जाणार नाही,’’ असे बनसोडे यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा >>> आता महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून क्रीडा पुरस्कार

गतवर्षी पात्र असूनही शिवछत्रपती पुरस्कारासाठी विचार न झालेल्या खेळाडूंचा नव्या पुरस्कार वर्षांत विचार करावा, अन्यथा वितरित केलेले पुरस्कारही परत घेण्याचे आदेश देऊ असा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला इशारा दिला आहे. याकडे बनसोडे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी वाद अधिक न ताणता या खेळाडूंना पुरस्कार देण्याची तयारी असल्याचे सांगितले. तसेच ऑलिम्पिक भवनाविषयी बनसोडे म्हणाले, ‘‘ऑलिम्पिक भवन उभारण्याचे अनेकांचे स्वप्न होते. क्रीडामंत्रीपदाची शपथ घेत असताना अजित पवार यांनी या प्रलंबित योजनेविषयी माहिती दिली होती. क्रीडामंत्री झाल्यावर सात महिन्यांत हे स्वप्न साकारण्यास सुरुवात झाली आहे. माझ्या कारकीर्दीत हे झाले याचा मला अभिमान आहे. आता एका वर्षांत हे ऑलिम्पिक भवन उभारले जाईल आणि येथे क्रीडापटूंना आवश्यक सुविधा उपलब्ध होतील.’’

शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांमध्ये वाद होण्याची परंपरा आम्हाला खंडित करायची आहे. पुरस्कारासाठी खेळाडूने न्यायालयात जाऊ नये असे आम्हाला वाटते. गेल्या वर्षी असे काही प्रसंग घडले. भविष्यात पुन्हा अशी वेळ येणार नाही याची काळजी घेतली जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– संजय बनसोडे, राज्य क्रीडामंत्री.