चांगली सुरुवात केल्यानंतरही महाराष्ट्राला सौराष्ट्रविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी पहिल्या डावात ६ बाद ३२० धावांवर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राकडून हर्षद खडीवाले, कर्णधार रोहित मोटवानी व अंकित बावणे यांनी शैलीदार अर्धशतके टोलवीत संघास ही मजल गाठण्यात यश मिळविले.
सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर सोमवारपासून सुरू झालेल्या या लढतीत खडीवाले (६७), मोटवानी (७०) व केदार जाधव (४९) यांच्या दमदार खेळाच्या जोरावर महाराष्ट्राची एकवेळ २ बाद २१० अशी भक्कम स्थिती होती, मात्र नंतर केवळ १८ धावांत महाराष्ट्राने चार विकेट्स गमावल्या. तथापि बावणे याने संग्राम अतितकर (३९) याच्या साथीत संघाचा डाव सावरला. त्यामुळेच महाराष्ट्रास तीनशे धावांचा टप्पा ओलांडता आला.
महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. खडीवाले याने स्वप्नील गुगळे याच्या साथीत महाराष्ट्राच्या पहिल्या डावास सुरुवात केली. मात्र कारकीर्दीतील दुसरा रणजी सामना खेळणाऱ्या गुगळे याला चमक दाखवता आली नाही. केवळ ११ धावांवर तो बाद झाला. मधल्या फळीऐवजी पहिल्या फळीत खेळावयास आलेल्या मोटवानी याने खडीवालेच्या साथीत ८१ धावांची भागीदारी केली. खडीवाले याने १२८ मिनिटांत एक षटकार व सात चौकारांसह ६७ धावा केल्या. खडीवाले याच्या जागी आलेल्या जाधव याने मोटवानी याला चांगली साथ दिली. जाधव याने आक्रमक खेळ करीत तीन चौकार व एक षटकारासह ४९ धावा केल्या. अर्धशतकापूर्वीच तो बाद झाला, मात्र त्याने मोटवानीच्या साथीत ९७ धावांची भर घातली. पाठोपाठ महाराष्ट्राने मोटवानी व राहुल त्रिपाठी (१४) यांच्याही विकेट्स गमावल्या. मोटवानी याने कर्णधाराला साजेसा खेळ करीत सात चौकारांसह ७० धावा केल्या.
या मोसमात अनेक वेळा संघास सावरणाऱ्या बावणे याने पुन्हा एकदा संघास सावरले. त्याने अतितकरच्या साथीत सहाव्या विकेटसाठी २३.३ षटकांत ८४ धावांची भर घातली. अतितकर याने तीन चौकारांसह ३९ धावा केल्या. बावणे याने चार चौकार व एक षटकारासह नाबाद ५२ धावा केल्या. खेळ संपला त्या वेळी श्रीकांत मुंढे (नाबाद ३) हा त्याच्या साथीत खेळत आहे. सौराष्ट्रकडून कमलेश मकवाना याने तीन विकेट्स घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र पहिला डाव-९० षटकांत ६ बाद ३२० (स्वप्नील गुगळे ११, हर्षद खडीवाले ६७, रोहित मोटवानी ७०, केदार जाधव ४९, अंकित बावणे खेळत आहे ५२, राहुल त्रिपाठी १४, संग्राम अतितकर ३९, श्रीकांत मुंढे खेळत आहे ३, कमलेश मकवाना ३/७३, धर्मेदसिंह जडेजा २/१२०).