‘महाराष्ट्र श्री’शरीरसौष्ठव स्पर्धा : महेंद्र चव्हाण ‘महाराष्ट्र-श्री’

प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्पर्धेचा थरार उत्तरोत्तर रंगत गेला.

सातारा : यंदाच्या ‘महाराष्ट्र-श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेत अनुभवी महेंद्र चव्हाण विजयी ठरणार की जबरदस्त तयारीत असलेला अनिल बिलावा वरचढ ठरणार, याकडे तमाम शरीरसौष्ठवप्रेमींचे लक्ष लागले होते. दोघांमध्येही कडवी चुरस रंगलेली असताना पुण्याच्या महेंद्र चव्हाणने आपल्या अनुभवाच्या जोरावर ‘महाराष्ट्र-श्री’ किताब आपल्या नावावर केला.

सातारा येथील तालीम संघाच्या मैदानावर रविवारी रात्रीपर्यंत रंगलेल्या ‘महाराष्ट्र-श्री’ राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी सातारकरांनी तोबा गर्दी केली होती. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्पर्धेचा थरार उत्तरोत्तर रंगत गेला. गटविजेत्यांपैकी बिलावा, महेंद्र, रसेल दिब्रिटो आणि नीलेश दगडे यांना किताबाचा मानकरी मानले जात होते. पण खरी चुरस रंगली ती महेंद्र आणि बिलावामध्ये. अखेरच्या क्षणी पंचांनी दोघांची तुलना करण्याचे ठरवल्यानंतर यापैकीच एक विजेता होणार, हे जवळपास निश्चित झाले होते. चाहत्यांचा कौल बिलावाच्या बाजूने असला तरी पंचांनी मात्र महेंद्रच्या गळ्यात विजेतेपदाची माळ घातली. त्यामुळे तब्बल चार वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या महेंद्रचे ‘महाराष्ट्र-श्री’ पटकावण्याचे स्वप्न अखेर साकारले.

महिलांच्या शरीरसौष्ठव प्रकारात अमला ब्रह्मचारीचाच दबदबा दिसून आला. तिच्या शरीरसौष्ठवापुढे अन्य प्रतिस्पर्धी फिके वाटले. त्यामुळेच अमलाला दुसऱ्यांदा ‘महाराष्ट्र-श्री’चा किताब देताना पंचांना फारशी मेहनत घ्यावी लागली नाही. महिला फिजिक स्पोर्ट्स प्रकारात ‘मिस-मुंबई’ची विजेती रेणुका मुदलियार, दीपाली ओगले आणि पुण्याची आदिती बंब यांच्यात चुरस रंगली होती. पण दीपालीने रेणुकावर मात करत ‘मिस-महाराष्ट्र’चा मान पटकावला. विजेत्या सर्व खेळाडूंची इंदूर येथे २० ते २२ मार्चदरम्यान होणाऱ्या ‘भारत-श्री’ राष्ट्रीय अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

‘महाराष्ट्र-श्री’चा निकाल

 •  ५५ किलो : १. अवधुत निगडे (कोल्हापूर), २. नितेश कोळेकर (उपनगर), ३. नितीन शिगवण (उपनगर)
 •  ६० किलो : १. नितीन म्हात्रे (ठाणे), २. देवचंद गावडे (उपनगर), ३. प्रीतेश गमरे (उपनगर)
 •  ६५ किलो : १. दिनेश कांबळे (ठाणे), २. उमेश गुप्ता (उपनगर), ३. फय्याज शेख (पुणे)
 • ७० किलो : १. तौसिफ मोमीन (पुणे), २. रोशन नाईक (पालघर), ३. मनोज मोरे (उपनगर)
 •  ७५ किलो : १. सुदर्शन खेडेकर (ठाणे), २. सतीश यादव (नवी मुंबई), ३. महेश जाधव (पुणे)
 • ८० किलो : १. अनिल बिलावा (मुंबई), २. भास्कर कांबळे (उपनगर), ३. राजू भडाळे (पुणे)
 •  ८५ किलो : १. सुशील मुरकर (मुंबई), २. गणेश पेडामकर (उपनगर), ३. हबीब सय्यद (ठाणे)
 • ९० किलो : १. रसेल दिब्रिटो (उपनगर), २. दीपक तांबीटकर (मुंबई), ३. संदेश सावंत (सिंधुदुर्ग)
 •  १०० किलो : १. महेंद्र चव्हाण (पुणे), २. अरुण नेवरेकर (मुंबई), ३. विशाल पखाले (सातारा)
 •  १०० किलोवरील : १. नीलेश दगडे (उपनगर), २. अक्षय मोगरकर (ठाणे)
 • ‘महाराष्ट्र-श्री’ किताब विजेता : महेंद्र चव्हाण (पुणे)
 •  महिला शरीरसौष्ठव : १. अमला ब्रह्मचारी (मुंबई), २. डॉ. माया राठोड (उपनगर), ३. तन्वी हक (पुणे)
 • महिला फिजिक स्पोर्ट्स : १. दीपाली ओगले (उपनगर), २. रेणुका मुदलियार (मुंबई), ३. आदिती बंब (पुणे)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maharashtra shri bodybuilding contest mahendra chavan akp

ताज्या बातम्या