महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशन आणि शिवाजी पार्क जिमखाना यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या सहाव्या महाराष्ट्र राज्य गुणांकन कॅरम स्पर्धेत पुरुषांमध्ये अनिल मुंडेने, तर महिलांमध्ये मैत्रेयी गोगटेने बाजी मारत कारकिर्दीत पहिल्यांदाच राज्य जेतेपदाच्या किताबाला गवसणी घातली. अंतिम फेरीत अनिलने विलास दळवीला अटीतटीच्या लढतीमध्ये २५-१७, १४-२५ आणि २५-९ असा पराभव करत अजिंक्यपद पटकावले. तर उदयोन्मुख मैत्रेयीने अनुभवी आयेशा मोहम्मदवर २५-१५, २५-१३ अशी सहजपणे मात करत जेतेपद पटकावले.
दोन्ही अंतिम सामने चांगलेच रंगतदार झाले. महिलांच्या सामन्यात पहिल्या गेममध्ये सातव्या बोर्डपर्यंत १५-१५ अशी बरोबरी होती, पण त्यानंतर अखेरचा बोर्ड ब्रेक करत मैत्रेयीने तब्बल १० गुण पटकावत पहिला गेम जिंकला. पहिला गेम जिंकल्यावर मैत्रेयीचे मनोबल कमालीचे उंचावले आणि तिने दुसरा गेम २५-१३ असा जिंकत पहिले-वहिले जेतेपद पटकावले. यापूर्वी जेतेपदाने बऱ्याचदा हुलकावणी देणाऱ्या अनिलने अंतिम फेरीत ‘राणी’ची पाठ काही सोडली नाही. जवळपास प्रत्येक बोर्डामध्ये त्याने राणी पटकावत गुण वाढवले आणि जेतेपद पटकावले.
आयेशासारख्या अनुभवी खेळाडूला नमवत राज्य जेतेपद पटकावण्याचा आनंद अवर्णनीय असाच आहे. पराभवांपासून मी बरेच काही शिकत गेले आणि त्याचाच फायदा मला या स्पर्धेच्या वेळी झाला. आता नक्कीच लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, त्याचबरोबर जबाबदारीही वाढली आहे. त्यामुळे यापुढेही उत्तमोत्तम कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल.
– मैत्रेयी गोगटे, महिला राज्य विजेती कॅरमपटू.
यापूर्वी मला २-३ वेळा जेतेपदाने हुलकावणी दिली होती, पण या वेळी माझा खेळ प्रतिस्पध्र्यापेक्षा चांगला झाला आणि त्यामुळेच मी जेतेपद पटकावू शकलो. आता राष्ट्रीय स्पर्धावर माझे लक्ष असून महाराष्ट्राचे नेतृत्व करणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे.
– अनिल मुंडे, पुरुष राज्य विजेता कॅरमपटू.