नटराज बेहरा व बिपलाब समंतराय यांनी केलेल्या शैलीदार अर्धशतकांमुळेच ओडिशा संघाला महाराष्ट्राविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात रविवारी पहिल्या दिवशी पहिल्या डावात ५ बाद २२३ अशी आश्वासक धावसंख्या रचता आली.
गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर नटराजने दमदार खेळ करीत ६६ धावा केल्या. याचप्रमाणे त्याने निरंजन बेहरा (२३) याच्या साथीत ५९ धावांची भागीदारी केली. समंतराय याने आक्रमक खेळ करीत नाबाद ६४ धावा करताना हलदर दास (नाबाद २८) याच्या साथीत ७८ धावांची अखंडित भागीदारी रचली.
ओडिशाचा कर्णधार अभिलाष मलिक याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्यांचा सलामीचा फलंदाज गिरिजाकुमार राऊत (१७) हा लवकर बाद झाला. मात्र त्यानंतर नटराज व निरंजन यांनी अर्धशतकी भागीदारी करीत संघाचा डाव सावरला. नटराजने ६६ धावांमध्ये १२ चौकार मारले. निरंजनने तीन चौकारांसह २३ धावा केल्या. या दोन फलंदाजांपाठोपाठ अनुराग सरंगी (१०) व मलिक (१) हे फलंदाजही तंबूत परतल्यामुळे ओडिशाचा डाव ५ बाद १४५ अशा अडचणीत सापडला. समंतराय व दास यांनी आक्रमक पवित्रा घेत चौफेर टोलेबाजी करीत संघाची घसरगुंडी रोखली. समंतरायने चार चौकार व दोन षटकार ठोकले. दास याने तीन चौकारांबरोबर एक षटकारही मारला. महाराष्ट्राकडून श्रीकांत मुंढे व डॉमिनिक मुथ्थुस्वामी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
ओडिशा (पहिला डाव) : ९० षटकांत ५ बाद २२३ (नटराज बेहरा ६६, निरंजन बेहरा २३, बिपलाब समंतराय खेळत आहे ६४, हलदर दास खेळत आहे २८; श्रीकांत मुंढे २/६१, डॉमिनिक मुथ्थुस्वामी २/२९)