अव्वल राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा
महाराष्ट्राच्या पुरुषांपाठोपाठ महिला संघाचेही आव्हान संपुष्टात आले आहे. महाराष्ट्राच्या महिला संघाची मजल उपांत्य फेरीपर्यंतच मर्यादित राहिली. उपांत्य लढतीत हरयाणाने महाराष्ट्राच्या आशा २९-१६ अशा धुळीस मिळवल्या. २००८चा अपवाद वगळता १९९६पासून गेल्या वर्षीपर्यंत राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेच्या उपविजेतेपदावर महाराष्ट्राचे वर्चस्व होते. २००८ला देखील हरयाणानेच उपांत्य फेरीत महाराष्ट्राचा पराभव केला होता.
पाटणा येथील पाटलीपुत्र बंदिस्त क्रीडा सकुलात झालेल्या या सामन्यात हरयाणाच्या प्रियांकाने तुफानी खेळ करीत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. महाराष्ट्राकडून दिपिका जोसेफने झुंजार प्रयत्न केले.
भारतीय रेल्वेच्या महिलांना सलग २९वे जेतेपद
भारतीये रेल्वेने हरयाणाचे आव्हान ३३-२४ असे मोडित काढताना ६१व्या अव्वल राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेत आपल्या खात्यावर महिला विभागातील २९वे जेतेपद जमा केले. भारतीय रेल्वेने अपेक्षेप्रमाणेच खेळ करीत मध्यंतरालाच २०-११ अशी आघाडी घेत आपले इरादे स्पष्ट केले. अनुभवी तेजस्विनी बाई आणि ममता पुजारी यांनी रेल्वेला हे जेतेपद मिळवून दिले. पुरुषांमध्ये राजस्थानने हरयाणाचा २७-२५ असा पराभव करून जेतेपद पटकावले.