उपांत्यपूर्व फेरीत ४० जेतेपदे नावावर असणाऱ्या मुंबईला चीतपट करणाऱ्या महाराष्ट्रासमोर उपांत्य फेरीत मातब्बर बंगालचे आव्हान असणार आहे. उपांत्य फेरीच्या मोठय़ा व्यासपीठावर खेळण्याचे दडपण महाराष्ट्राच्या खेळाडूंवर असणार आहे.
 जबरदस्त फॉर्मात असणारा हर्षद खडीवाले, आशिया चषकात भारताचे यशस्वी नेतृत्व करणारा विजय झोल आणि वेगवान फटकेबाजी प्रसिद्ध केदार जाधव यांच्यावर महाराष्ट्राच्या फलंदाजीची भिस्त आहे. अंकित बावणेकडूनही संघाला मोठय़ा अपेक्षा आहेत. मुंबईच्या फलंदाजांना जेरीस आणणाऱ्या अनुपम संकलेचा, समद फल्ला आणि श्रीकांत मुंढे हे वेगवान गोलंदाजांचे त्रिकुट महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहे. दुसरीकडे बंगालचा संघ मजबूत वाटतो आहे. लक्ष्मीरतन शुक्ला हा बंगालचा हुकूमी एक्का असणार आहे. अशोक दिंडा, वृद्धिमान साहा या अनुभवी खेळाडूंवर बंगालची भिस्त आहे. दरम्यान, मोहालीच्या दाट धुक्यात आणि कडाक्याच्या थंडीत कर्नाटकला पंजाबचा सामना करायचा आहे. मनीष पांडे, रॉबिन उथप्पा, विनय कुमार आणि अभिमन्यू मिथुन हे कर्नाटकसाठी महत्त्वपूर्ण आहेत. पंजाबतर्फे हरभजन सिंग आणि युवराज सिंग या अनुभवी खेळाडूंवर भिस्त आहे.