दुबई : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने निवृत्तीबाबतच्या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर देणे टाळताना पुढील ‘आयपीएल’ हंगामापूर्वी होणाऱ्या खेळाडू लिलावासाठीच्या ‘बीसीसीआय’च्या नियमांवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असल्याचे म्हटले. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने चौथ्यांदा ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावले. शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यानंतर धोनीला ‘तू जो वारसा सोडला आहेस, त्याचा तुला किती अभिमान आहे?’ असे विचारले गेले. याचे उत्तर देताना धोनी म्हणाला, ‘‘मी अजून (वारसा) सोडलेला नाही. पुढील ‘आयपीएल’ हंगामात दोन नव्या संघांचा समावेश करण्यात येणार असून खेळाडूंना संघात कायम ठेवण्याबाबत ‘बीसीसीआय’ काय निर्णय घेते, यावर बऱ्याच गोष्टी ठरतील. आम्हाला चेन्नई संघाच्या हिताचा प्रामुख्याने विचार करावा लागेल.’’ चेन्नईने पुढील दशकभराचा विचार करणे गरजेचे असल्याचे धोनीला वाटते. त्याने यापूर्वीही चेन्नईमध्ये अखेरचा सामना खेळून निवृत्त व्हायला आवडेल असे सांगितले होते.