कबड्डीचा भूतकाळ हा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो, तर वर्तमानकाळ उत्तरेकडील राज्यांची मक्तेदारी सिद्ध करतो. मात्र मध्य प्रदेशसारख्या ठिकाणी कबड्डी पुरेशी वाढली नाही. या राज्यात जे काही कबड्डीचे अस्तित्व दिसून येते, ते प्रामुख्याने इंदूरमध्ये आहे. मध्य प्रदेशात कबड्डीला तेवढय़ा प्रमाणात नोकऱ्यांची संधी उपलब्ध नसल्यामुळे खेळाच्या विकासासाठी आवश्यक वातावरण अद्याप निर्माण होऊ शकलेले नाही. या परिस्थितीत प्रो कबड्डीतील पाटणा पायरेट्स संघाचा चढाईपटू महेश गौड सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे.
मध्य प्रदेशात कबड्डीपटूंना नोकऱ्यांसाठी अनुकूल वातावरण नसतानाही महेशकडे मात्र नोकरी आहे. जबलपूरच्या लष्करी दारूगोळा विभागात (ऑर्डिनन्स फॅक्टरी) नोकरी करतो. याविषयी तो म्हणतो, ‘‘नोकरीच्या दृष्टीने मी अतिशय नशीबवान ठरलो. त्यांना पाच-सहा खेळांच्या खेळाडूंपैकी एकाची निवड करायची होती आणि त्यांनी कबड्डीची निवड केली. त्यामुळेच माझी वर्णी लागू शकली.’’
महेशचे बालपण अतिशय हलाखीचे गेले. २००२मध्ये त्याच्या वडिलांचे अपघातात निधन झाले. त्यानंतर त्याच्या मोठय़ा भावाने छोटी-मोठी कामे करून कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा. कबड्डीची आवड कशी निर्माण झाली, हे सांगताना महेश आठवणींत हरवून गेला. ‘‘माझे काका दिलीप गौड हे कबड्डी खेळायचे. मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनीच मला सतराव्या वर्षी कबड्डीची दिक्षा दिली. त्यावेळी हा खेळ इतकी मोठी उंची गाठू शकेल, असे केव्हाही वाटले नव्हते. मी कबड्डी खेळासाठी मेहनत घ्यायला लागलो आणि आवड निर्माण होत गेली.’’
कबड्डीत यश मिळेल आणि हाच खेळ आपला रोजगाराचा प्रश्न सोडवेल, हा विश्वास महेशच्या मनात दृढ होता. त्यानंतर राज्य अजिंक्यपद आणि राष्ट्रीय स्पध्रेत महेशने छाप पाडली. त्यामुळे २०१२पासून भारतीय संघाच्या कबड्डी शिबिरासाठी त्याची निवड झाली. इथेच त्याच्या खेळाला पैलू पडत गेले. याविषयी महेश म्हणाला, ‘‘राकेश कुमारसारख्या अनुभवी कबड्डीपटूकडून आणि बलवान सिंग यांच्यासारख्या निष्णात प्रशिक्षकाकडून या शिबिरांमध्ये अप्रतिम मार्गदर्शन मिळाले. त्यामुळेच माझा खेळ विकसित होत गेला.’’ फुकेट येथे झालेल्या समुद्रकिनारी कबड्डी स्पध्रेत महेशने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानंतर प्रो कबड्डी लीगमध्ये गेले काही वष्रे तो खेळतो आहे. आता प्रो कबड्डीतील आर्थिक उत्पन्नामुळे कुटुंब स्थिरस्थावर झाले आहे. प्रो कबड्डीमुळे घरात आणि परिसरात आता मला ओळखू लागले आहेत. त्यामुळे कुटुंबाला माझा हेवा वाटतो आहे. ऑलिम्पिकमध्ये कबड्डी येईल, तेव्हा भारताचे प्रतिनिधित्व करायचे आहे, असे महेशने सांगितले.