बुद्धिबळ.. हा खेळ म्हटला की सामान्य मुलं जरा दूरच राहणं पसंत करतात. हा खेळ हुशार मुलांसाठी आहे. त्यांचं डोकं या खेळात चांगलं चालतं. आपल्याला हे काही जमायचं नाही, कालपर्यंत अशी मतं असलेल्या अनेक युवकांशी या खेळानं आता चांगली बट्टी जमवली आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात युवकांनाही त्यांच्या कलेनं प्रशिक्षण देणारा गुरू हवा. मग तो सातासमुद्रापार का असेना. बुद्धिबळानेही तंत्रज्ञानाची कास पकडून अनेक युवकांना आकर्षित केलं आहे. वैयक्तिक प्रशिक्षणाची जागा आता ऑनलाइनने घेतली आहे आणि युवकांना हा खेळ समजणं अधिक सोयीस्कर झालं आहे.

अमेरिकेच्या ‘इंटरनेट चेस क्लब’ या वेबसाइटनं (संकेतस्थळाने) बुद्धिबळ प्रशिक्षणाची व्याख्या बदलली आहे. ऑनलाइन प्रशिक्षण शाळेच्या या उपक्रमावर मतमतांतरं असू शकतात. पण याच शिक्षण पद्धतीनं जगातील बुद्धिबळ शिकू पाहणाऱ्या इच्छुकांना एकत्र आणलं आहे. द्रोणाचार्य पुरस्कारविजेते रघुनंदन गोखले हे या संकेतस्थळावर जगभरातील त्यांच्या विद्यार्थ्यांना बुद्धिबळ शिकवत आहेत. त्यांच्यासारखे ३० हजारांहून अधिक बुद्धिबळ प्रशिक्षक या संकेतस्थळावर प्रशिक्षण देत आहेत.

‘‘प्रशिक्षणाची ही पद्धत बुद्धिबळ शिकणाऱ्या प्रत्येकाला फायदेशीर आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे प्रत्यक्ष जाणं शक्य नसल्यामुळे ही शिक्षण पद्धत उपयुक्त आहे. येथे एकाच वेळी मी सहा देशांतील माझ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊ शकतो,’’ अशी माहिती गोखले यांनी दिली.

या संकेतस्थळावर पहिला एक महिना आपल्याला मोफत प्रशिक्षण घेता येईल, परंतु त्यानंतर काही किंमत मोजावी लागते. येथे विद्यार्थी आणि प्रशिक्षक यांना ‘स्काइप’द्वारे एकमेकांशी संवादही साधता येतो. एकाच वेळी अनेक जण प्रशिक्षण घेत असल्यास त्यांच्याशी ऑनलाइन पटकाखालील असलेल्या संदेश प्रणालीच्या माध्यमातून चर्चा केली जाते आणि त्यांना पटावरील चालींबाबत माहिती दिली जाते. हे ‘व्हच्र्युअल’ पटावर प्रात्यक्षिकद्वारे शिकवलं जात असल्यानं खेळाडूंना ते समजावून घेणं सोपं जातं. या ऑनलाइन शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यांला प्रशिक्षक निवडायची मुभा असते. लहान मुलांसाठी विशेष गट तयार करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे पालकांना आपल्या मुलाची बुद्धिबळातील प्रगतीही पाहता येते.

ऑनलाइन प्रशिक्षण

  • प्रशिक्षक निवडीबाबत असलेले अनेक पर्याय, विशेषत: ग्रामीण विभागातील खेळाडूंसाठी फायद्याचं
  • प्रवास करावा लागत नाही.
  • एखादी चाल पुन्हा खेळता येते आणि त्यामुळे शिकणे अधिक सुलभ होते
  • संदेश खिडकीच्या (चॅट व्हिंडो) माध्यमातून प्रशिक्षकांकडून खेळाबाबत अधिक जाणून घेणे सोपं जातं
  • स्काइप व्हिडीयो कॉलच्या माध्यमातून एकमेकांशी संवाध होऊ शकतो.

वैयक्तिक प्रशिक्षण

  • समोरासमोर प्रशिक्षणामुळे प्रशिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात चांगले ताळमेळ जमते. विद्यार्थ्यांच्या देहबोलीवरून त्याला एखादी चाल समजली आहे की नाही, हे सहज जाणता येते.
  • अननुभवी खेळाडूंना पटावर अधिक चांगल्या पद्धतीने शिकता येते. त्यांना व्हच्र्युअल पटापेक्षा खऱ्याखुऱ्या पटावर सराव करायला मिळतो.
  • प्रशिक्षकांनी शिकवलेल्या चालींची नोंद करून ते थ्री-डी पटावर त्याचा सराव करू शकतात.
  • प्रवास खर्च वाढतो आणि बराच वेळ त्यात खर्ची जातो. त्यामुळे ही पद्धत अधिक खर्चीक ठरते.

विद्यार्थ्यांची प्रगती जाणून घेण्याच्या दृष्टीनं वैयक्तिक प्रशिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांच्या देहबोलीतून त्याला एखादा डाव किती समजला आहे किंवा नाही याचं विश्लेषण करणं सोपं जाते.   अमरदीप बारटक्के, प्रशिक्षक

पहिल्या टप्प्यात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक प्रशिक्षणच महत्त्वाचे आहे. मात्र पटावरील चौकटीची जाण असलेल्या खेळाडूसाठी ऑनलाइन हा उत्तम पर्याय आहे. आज मी तीन देशांतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहे.  अभिजित जोशी, प्रशिक्षक

ऑनलाइन प्रशिक्षणात खेळाडूंना प्रशिक्षक निवडीबाबत अनेक पर्याय उपलब्ध असतात. विशेषत: ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी हे फायद्याचे आहे. प्रवास करावा लागत नाही, परंतु खेळाडूंना एखादी चाल समजली आहे की नाही, हे या पद्धतीत जाणून घेणे कठीण जाते. त्यासाठी वैयक्तिक प्रशिक्षण महत्त्वाचे ठरते.   राजाबाबू गजेंगी, मुंबई बुद्धिबळ संघटनेचे सचिव व प्रशिक्षक

इंटरनेट चेस क्लब

  • अमेरिकेतील या संकेतस्थळावर बुद्धिबळ शिकू शकतो, त्यावर चर्चा करू शकतो आणि दिग्गज खेळाडूंकडून मार्गदर्शनही मिळवू शकतो.
  • या संकेतस्थळावर ३० ते ३५ हजारांहून अधिक सदस्य आहेत. एकाच वेळी २५०० सदस्य येथे खेळू शकतात.
  • १९८० मध्ये इंटरनेट चेस सव्‍‌र्हर या नावाने संकेतस्थळाची स्थापना करण्यात आली. मात्र त्यात बऱ्याच त्रुटी होत्या. त्या सुधारण्यासाठी १५ वर्षांचा कालावधी लागला.
  • १ मार्च १९९५मध्ये त्याचे नामकरण इंटरनेट चेस क्लब असे झाले आणि वर्षांला ४९ डॉलर इतका शुल्क आकारण्यात आला. मात्र सहा महिन्यांहून अधिक काळ असलेल्या सदस्यांना पुढील सहा महिने मोफत प्रशिक्षण देण्यात आले.