मथळा वाचून थोडं बुचकळ्यात पडल्यासारखं झालं ना? चक्रावून जाऊ नका.. विम्बल्डन स्पध्रेची स्थापना १८७७ साली झाली असून ती अजूनही जगातील सर्वात जुनी स्पर्धाच आहे. जगातील महत्त्वाच्या स्पर्धामध्ये अग्रणीचं स्थान असलेल्या विम्बल्डन स्पध्रेत यंदा तिशी ओलांडलेल्या खेळाडूंमध्ये जेतेपदाची चुरस रंगणार असल्याने त्याला ‘तिशीपल्याडचं विम्बल्डन’ संबोधणंच अधिक योग्य ठरेल. प्रत्येक वर्षी अशी तिशी ओलांडलेली मंडळी ग्रँडस्लॅममध्ये खेळतात, परंतु या मंडळींमध्ये आत्ता दिग्गज टेनिसपटूंचा समावेश झाला आहे. त्यांची टेनिस कारकीर्द अखेरच्या टप्प्यात आली असून नव्या दमाचे खेळाडू ग्रँडस्लॅम स्पर्धावर राज्य गाजवण्यासाठी सज्ज असल्याचे हे संकेत आहेत.
यंदा पुरुष एकेरीत जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या अँडी मरे, राफेल नदाल, स्टॅनिस्लास वॉवरिंका, नोव्हाक जोकोव्हिच आणि रॉजर फेडरर टेनिसविश्वावर जवळपास १५ वष्रे अधिराज्य गाजवणाऱ्या या खेळाडूंची वये अनुक्रमे ३०, ३१, ३२, ३० आणि ३५ अशी आहेत. वॉवरिंका किंवा फेडरर यांनी यंदा जेतेपदाचा चषक उंचावला तर ऑर्थर अॅश यांच्या नावावर असलेला विक्रम मोडला जाईल. १९७५ साली अॅश यांनी ३१ वष्रे ११ महिने आणि २५ दिवसांच्या वयात विम्बल्डन जेतेपद पटकावलं होतं. फेडरर येथे विक्रमी आठवे जेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक आहे. या स्पध्रेत सर्वाधिक सात एकेरी जेतेपदे पटकावणाऱ्यांमध्ये फेडररसह विल्यम रेनशॉ आणि पीट सॅम्प्रस यांचा समावेश आहे. हा विक्रम मोडण्याचा प्रवास सोमवारपासून सुरू होत आहे. त्यामुळे यात कोण बाजी मारणार आणि कोणता नवीन विक्रम प्रस्थापित होणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
यंदाची ही स्पर्धा खऱ्या अर्थाने महत्त्वाची आहे, ती स्वित्र्झलडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररसाठी. कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात खेळत असलेल्या फेडररला विम्बल्डनच्या हिरवळीने नेहमी ताजेतवाने केले आहे आणि म्हणूनच निवृत्तीचा सल्ला देणाऱ्यांना तो सडेतोड उत्तर देत आहे. पण गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या चर्चेप्रमाणे कदाचित त्याची ही अखेरची विम्बल्डन स्पर्धा असू शकते. त्यामुळे विम्बल्डन इतिहासात स्वत:चे नाव अजरामर करण्यासाठी फेडरर आतुर आहे. २०१० ते २०१२ या कालावधीत फेडररच्या नावावर एकही ग्रँडस्लॅम जेतेपद नव्हते, परंतु २०१२ च्या विम्बल्डन स्पध्रेत त्याने जेतेपदाला गवसणी घातली होती. उपांत्य फेरीत नोव्हाक जोकोव्हिचचा (६-३, ३-६, ६-४, ६-३) अडथळा पार करून अंतिम फेरीत त्याने अँडी मरेवर ४-६, ७-५, ६-३, ६-४ असा विजय मिळवला होता. त्या वेळी त्याचे वय ३० वष्रे आणि ११ महिने होते. मात्र पुढील पाच वष्रे पुन्हा फेडररची ग्रँडस्लॅम जेतेपदाची पाटी कोरीच राहिली. २०१७ च्या हंगामात त्याने ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा, इंडियन वेल्स, मियामी आणि हॅल खुली स्पर्धा जिंकून विम्बल्डन जेतेपदावरील दावेदारी मजबूत केली आहे. त्यामुळे फेडरर कारकीर्दीतील अखेरच्या विम्बल्डन स्पध्रेचा शेवट गोड करतो का, याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली आहे. त्याच्या मार्गात उपांत्य फेरीत जोकोव्हिचचा अडथळा येण्याची शक्यता आहे.
- ०२ भारताचे रामनाथन कृष्णन यांनी विम्बल्डनच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत दोन वेळा प्रवेश केला. मात्र त्यांना उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करण्यापासून नील फ्रेजर (१९६०) आणि रॉड लेव्हर (१९६१) यांनी रोखले.
- १९९९ भारत आणि विम्बल्डन जेतेपद हा प्रवास १९९९ पासून सुरू झाला. लिएण्डर पेस आणि महेश भूपती या युवा खेळाडूंनी पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत नेदरलँड्सच्या पॉल हॅऱ्हुईस आणि अमेरिकेच्या जॅरेड पाल्मेर या जोडीवर ६-७(१०), ६-३, ६-४, ७-६(४) असा विजय मिळवला.
- ०६ महेश भूपती आणि लिएण्डर पेस यांनी मिश्र दुहेरीत आपापल्या साथीदारासह अनुक्रमे २ व ४ अशी एकूण ६ जेतेपदे येथे पटकावली आहेत. पेसने लिझा रेमंड (१९९९), मार्टिना नवरातिलोव्हा (२००३), कारा ब्लॅक (२०१०) आणि मार्टिना हिंगिस (२०१५) यांच्यासह, तर महेश भूपतीने एलिना लिखोव्हत्सेव्हा (२००२) आणि मेरी पिएर्से (२००५) यांच्यासह विम्बल्डन मिश्र दुहेरी जेतेपद जिंकले.
- १२ सानिया मिर्झाने १२ वर्षांनंतर म्हणजेच २०१५ मध्ये मार्टिना हिंगिससह येथे महिला दुहेरी जेतेपदाला गवसणी घातली. या जोडीने एकाटेरिना माकारोव्हा आणि एलिना व्हेस्निना यांचा ५-७, ७-६(७-४), ७-५ असा पराभव केला. २००३ मध्ये सानियाने रशियाच्या अॅलिसा क्लेबानोव्हासह कनिष्ठ मुली गटाचे जेतेपद पटकावले होते.
महिलांमध्ये व्हीनस सर्वात वयस्कर
सेरेना विल्यम्स आणि मारिया शारापोव्हा यांच्या अनुपस्थितीत महिला गटातील जेतेपदाची संधी सर्वासाठी खुली झाली आहे. पण महिला गटातही वयाची ३० वष्रे पूर्ण झालेले अनेक खेळाडू आहेत. यामध्ये सर्वात वयस्कर आहे ती ३७ वर्षांची व्हीनस विल्यम्स. व्हीनसने २००८ साली अखेरचा विम्बल्डनचा चषक उंचावला होता. बहीण सेरेनाच्या अनुपस्थितीत जेतेपद पटकावून इतिहास घडवण्यासाठी व्हीनस प्रयत्नशील आहे. तिच्यासह चेक प्रजासत्ताकची ल्युसी साफारोव्हा (३० वष्रे), बेल्जियमची किस्र्टेन फ्लिप्केन्स (३१), अमेरिकेची बेथानिक मॅथेक-सँड्स (३२), रशियाची स्वेतलाना कुझ्नेत्सोव्हा (३०), इटलीची सारा इराणी (३०) आणि रशियाची एलिना व्हेस्निना (३०) या तिशी ओलांडलेल्या महिला खेळाडूंचाही यंदाच्या विम्बल्डन स्पध्रेत समावेश आहे.
भारत आणि विम्बल्डन..
लिएण्डर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा या भारताच्या दुहेरीतील खेळाडूंनी ग्रँडस्लॅम स्पर्धामध्ये आपले स्वत:चे वर्चस्व निर्माण केले आहे. यामध्ये आता रोहन बोपन्नाच्या नावाचाही समावेश झाला आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पध्रेत रोहनने कॅनडाची सहकारी गॅब्रिएला डॅब्रोवस्कीसह मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावले आहे. मात्र एकेरीत रामनाथन कृष्णन यांच्यानंतर भारतीय टेनिसपटूंना छाप पाडता आलेली नाही.