Digvesh Rathi vs Nitish Rana: दिल्ली प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. ही स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे.या स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना वेस्ट दिल्ली लायन्स आणि साउथ दिल्ली सुपरस्टार्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा सामना होता, त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडू पूर्ण जोर लावताना दिसून आले.या सामन्यात नितीश राणा आणि दिग्वेश राठी यांच्यात जोरदार राडा झाला. दोघेही खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून गेले. शेवटी खेळाडू आणि पंचांनी मध्यस्थी केली, त्यामुळे हा वाद थांबला. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दिग्वेश राठी आपल्या सेलिब्रेशनमुळे आयपीएल २०२५ स्पर्धेत तुफान चर्चेत राहिला. यादरम्यान त्याच्यावर बंदी देखील घातली गेली होती. पण त्याने आपलं सेलिब्रेशन करणं काही सोडलं नव्हतं. या सामन्यात वेस्ट दिल्ली लायन्स संघाला मोठ्या धावांचा पाठलाग करायचा होता. त्यावेळी दिल्ली लायन्स संघाकडून नितीश राणा फलंदाजी करत होता, तर साऊथ दिल्ली सुपरस्टार्स संघाकडून दिग्वेश राठी गोलंदाजी करत होता.

दिग्वेश राठी या षटकातील एक चेंडू टाकण्याआधीच थांबला. मग तो जेव्हा पुढचा चेंडू टाकत होता, इतक्यात नितीश राणाने त्याला थांबवलं. हे दिग्वेश राठीला आवडलं नाही.इथून दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. पुढच्याच चेंडूवर नितीश राणाने रिव्हर्स स्वीप फटका मारून षटकार खेचला आणि आपल्या बॅटला किस केलं. इथून हे प्रकरण चांगलच तापलं. दोघेही एकमेकांना काहीतरी बोलताना दिसून आले. पंच आणि संघातील इतर खेळाडू हा वाद शांत करण्यासाठी धावले. त्यामुळे हा वाद मिटला. पण या वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

राणाची दमदार शतकी खेळी

हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा होता. कारण विजेत्या संघाला क्वालिफायर २ चा सामना खेळण्याची संधी मिळणार होती. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना साऊथ दिल्ली सुपरस्टार्सने २०१ धावा केल्या होत्या. या संघाकडून क्रिश यादवने ३१ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली लायन्स संघाने १७.१ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं. या संघाकडून फलंदाजी करताना नितीश राणाने ४२ चेंडूत दमदार शतकी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १५ षटकार आणि ८ चौकार मारले.