‘देव तारी, त्याला कोण मारी’ अशी एक म्हण आहे. त्याच धर्तीवर भारतीय क्रिकेटविश्वात ‘बीसीसीआय तारी, त्याला कोण मारी’ असे चित्र पाहायला मिळते. बीसीसीआयने आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात दोषी ठरलेल्या खेळाडूंना शिक्षा दिली, हे जरी बरोबर असले तरी काही वर्षांपूर्वीची प्रकरणे आठवून पाहा. २००० साली असेच मॅच-फिक्सिंगचे प्रकरण सर्वासमोर आले होते, तेव्हा दोषी खेळाडूंवर बीसीसीआयने कारवाई केली होती, पण हेच खेळाडू सध्या बीसीसीआयच्या पंखांखाली असल्याचे चित्र आहे. आताच्या प्रकरणात बीसीसीआयने दोषी खेळाडूंना शिक्षा देऊन, आपण किती पारदर्शी आणि शिस्तप्रिय वैगरे असल्याचे दाखवून दिले असले तरी यापुढेही ते आपल्या निर्णयावर कायम राहतील याची शाश्वती नाही.
मुळात एखादा खेळाडू फिक्सिंगकडे का वळला जातो, याचे उत्तर सोप्या शब्दांत द्यायचे तर कमी वेळात जास्त पैसा कमवण्यासाठी. या खेळाडूंना खरेच पैशांची निकड होती का?.. की त्यांना मिळणारा पैसा पुरेसा नव्हता?  रणजी संघात स्थान, नामांकित कंपनीत नोकरी, खेळाच्या जोरावर पैसा तर मिळत होताच. चंगळवादी आणि भांडवलशाहीच्या युगात पैसाच सर्वस्व आहे, अशी मानणारी मंडळी खोऱ्याने सापडतात आणि या पैशासाठी काहीही करायला तयार असलेली मंडळीही, पण त्यांच्या या प्रकाराला नक्कीच आळा घालता येऊ शकतो. पहिल्यांदा खेळाडूने ठरवायला हवे की, माझ्यासाठी खेळ सर्वस्व आहे. कारण त्याच्या जोरावरच त्याला पैसा, यश, प्रसिद्धी, किर्ती मिळू शकते. त्याचबरोबर बीसीसीआयने दोषी खेळाडूंवर कडक कारवाई करायला हवी आणि त्यावर ठाम राहायला हवे, असे झाल्यास खेळाडूंवर वचक राहील. परंतु दुर्दैवाने तसे होताना तर दिसत नाही. मोहम्मद अझरूद्दीनवर आजीवन बंदी घालण्यात आली, पण तोच बीसीसीआयच्या कार्यक्रमांमध्ये दिसतो. आता तर तो प्रशिक्षण करण्यासाठीही सज्ज असल्याचे ऐकिवात आहे. अजय जडेजावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. पण त्यानंतर तोदेखील अगदी समालोचकाच्या भूमिकेत दिसतो. जर खेळाडूंपुढे असेच ‘आदर्श’ बीसीसीआय ठेवत असेल तर फिक्सिंगची प्रकरणे रोखली जातील का? या प्रकरणात जे दिल्ली पोलिसांनी केले ते बीसीसीआयला करता आले नसते का? असे बरेच प्रश्न उपस्थित होतात. मूळात या साऱ्या प्रकारांमध्ये बीसीसीआयही दोषी आहेच. यापूर्वीच बीसीसीआयने दोषी खेळाडूंना क्रिकेट वर्तुळाच्या बाहेर काढले असते, त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यावर कायम राहिले असते तर त्यानंतर खेळाडू असे गैरप्रकार करायला धजावले नसते.बीसीसीआयप्रमाणेच भारतीय कायद्यामध्येही या प्रकरणातील गुन्ह्य़ांसाठी विशेष तरतूद दिसत नाही. या दोषी खेळाडूंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला गेला. दिल्ली पोलिसांनी हजारो पानांचे आरोपपत्र दाखल केले असले तरी हे सर्व दोषी खेळाडू जामिनावर मुक्तपणे संचार करताना दिसतात. आतापर्यंत एकाही दोषी खेळाडूला किंवा सट्टेबाजाला शिक्षा झाल्याचे तरी ऐकिवात नाही. आणि  यामुळेच खेळाडूंना कायद्याचा धाक नाही. कायदा सक्षम वाटत असला तरी कुठे ना कुठेतरी तो कमी पडताना दिसतो आणि त्यामुळेच दोषी खेळाडू सहीसलामत बाहेर पडताना दिसतात. आयपीएलचे हे स्पॉट-फिक्सिंग प्रकरण प्रकाशात आल्यावरही या स्पर्धेचे काही सामने सट्टेबाजांनी निश्चित केले असल्याची वृत्त आली होती.
काही वर्षांपूर्वी एखाद्या युवा क्रिकेटपटूला त्याचे स्वप्न विचारले तर ‘भारताकडून खेळायचे’ असे उत्तर तो द्यायचा, पण आताच्या क्रिकेटपटूंची स्वप्न बदलेली आहेत आणि तीच याप्रकरणांसाठी पुरक ठरताना दिसतात. मी फिक्सिंग केल्यावर शिक्षा होईल, पण काही वर्षांनी बीसीसीआय आपल्याला पाठिशी घालेल, अशी धारणा काही खेळाडूंची असू शकेल आणि त्याचमुळे त्यांनी क्रिकेटची आणि चाहत्यांच्या प्रेमाची फसवणूक केली असावी. फिक्सिंगप्रकरणातील दोषी खेळाडूंना किंवा सट्टेबाजांना आतापर्यंत मोठी शिक्षा न झाल्याने हे गैरव्यवहार फोफावत चालले आहेत. बीसीसीआय आणि कायदा जोपर्यंत याप्रकरणी अधिक सक्षम, पारदर्शी, कडक होत नाही, तोपर्यंत तरी हे असेच चालू राहण्याची भीती असेल. त्यामुळेच फिक्सिंग इथले संपणार का नाही, अशी शंकेची पाल काही जणांच्या मनात चुकचुकते आहे. दोषी खेळाडूंना पहिल्यांदा शिक्षा करून कालांतराने त्यांना पाठिशी घालण्याचे व्यवसाय बीसीसीआयने थांबवायला हवेत आणि कायद्यानेही अशा प्रकारच्या गुन्ह्य़ांसाठी विशेष तरतूद करायला हवी. त्याचबरोबर ज्याच्यापासून या साऱ्या प्रकरणाची सुरुवात होते त्या खेळाडूने स्वत:शी, खेळाशी आणि आपल्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांशी इमान राखले तर सर्व प्रश्न सुटतील, अन्यथा क्रिकेट हा खेळ सभ्य गृहस्थांचा राहणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Match fixing does not stops here
First published on: 22-09-2013 at 01:05 IST