महाराष्ट्राचा उदयोन्मुख नेटबॉलपटू मयूरेश पवार या १९ वर्षीय खेळाडूचे केरळमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत हृदयविकाराने निधन झाले.
मयूरेश हा महाराष्ट्राकडून नेटबॉलमध्ये प्रतिनिधित्व करीत होता. अव्वल दर्जाचा सेंटर फॉरवर्ड खेळाडू म्हणून त्याने नावलौकिक मिळविला होता. महाराष्ट्राचा चंडिगढबरोबर सकाळी ११ वाजता सामना झाल्यानंतर मयूरेशसह महाराष्ट्राचे खेळाडू येथून जवळच असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर भटकंती करावयास गेले होते. तेथे त्याच्या छातीत दुखायला लागले व हृदयविकाराचा झटका बसल्यामुळे चक्कर येऊन तो खाली कोसळला. त्याच्या सहकाऱ्यांनी त्वरित संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. लगेचच त्याला रुग्णालयात नेण्यात आले. वाटेत त्याला पुन्हा हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
मयूरेश हा मूळचा सातारा जिल्हय़ातील खटाव तालुक्यात मायणी येथील रहिवासी आहे. दोन वर्षांपूर्वी तो बास्केटबॉल व नेटबॉल या दोन्ही क्रीडाप्रकारांत भाग घेत असे. मात्र गेले दोन वर्षे त्याने नेटबॉलवर अधिक लक्ष केंद्रित केले होते. या क्रीडा प्रकारातच त्याने कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला होता. तो इस्लामपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होता.  

मयूरेशच्या कुटुंबाला सर्व मदत मिळेल -शिरगावकर
मयूरेशच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून, त्यांना भारतीय ऑलिम्पिक महासंघ (आयओए) व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेतर्फे (एमओए) मदत केली जाईल, असे आयओएवर महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून काम करणारे नामदेव शिरगावकर यांनी सांगितले. ते स्वत: येथे महाराष्ट्राच्या पथकातच वरिष्ठ अधिकारी म्हणून आले आहेत. ते म्हणाले, ‘‘मयूरेशचे पार्थिव मंगळवारी सकाळी येथून मुंबईला नेण्यात येणार आहे. तेथून त्याचे पार्थिव त्याच्या गावी नेण्याची व्यवस्था एमओएतर्फे केली जाणार आहे. मयूरेशचा आकस्मिक मृत्यू ही आमच्या पथकातील सर्वाना धक्का देणारी घटना आहे. उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या हेतूने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित केली जात असते. मात्र मयूरेशची कारकीर्द बहरण्यापूर्वीच त्याचे निधन व्हावे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.’’ दरम्यान, येथे सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मयूरेशला श्रद्धांजली वाहिली. संयोजन समितीची मंगळवारी तातडीची बैठक होणार असून, त्यांच्यातर्फेही मयूरेशच्या कुटुंबीयांना काही मदत घोषित केली जाणार आहे, असेही शिरगावकर यांनी सांगितले.

मयूरेश पवारच्या निधनाबाबत राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी शोक प्रकट केला आहे. मुंबईत शवविच्छेदन केल्यानंतर मयुरेशचे पार्थिव कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात येईल. याचप्रमाणे सरकारच्या नियमानुसार त्याला तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे तावडे यांनी सांगितले.