तेरा हा आकडा तसा अशुभ किंवा अपशकुनी मानला जातो. परंतु मुंबई क्रिकेटच्या वर्तुळात या १३ तारखेची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. कारण मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याचा हा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे शनिवारी सायंकाळी प्रत्यक्षात कोण रिंगणात आहेत, हे स्पष्ट होणार आहे. एमसीए निवडणुकीसाठी ५८ उमेदवारी अर्ज दाखल झाले असले तरी सावधगिरी म्हणून करण्यात आलेले बरेचसे अर्ज मागे घेतले जातील आणि निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
एमसीएच्या रिंगणात बाळ म्हाडदळकर पॅनेल आणि क्रिकेट फर्स्ट यांच्यात लढत रंगणार असून, अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व ‘क्रिकेट फस्र्ट’चे विजय पाटील यांच्या थेट लढत अपेक्षित आहे. परंतु आशीष शेलार, रवी सावंत यांचेसुद्धा अर्ज आलेले आहेत.
उपाध्यक्षपदासाठी म्हाडदळकर गटाकडून दिलीप वेंगसरकर व शेलार तर ‘क्रिकेट फर्स्ट’कडून प्रताप सरनाईक व राहुल शेवाळे नशीब आजमवण्याची चिन्हे आहेत. तर स्वतंत्र उमेदवार रामदास आठवले यांच्यासहित एकंदर पाच जणांची नावे टिकू शकतील. कोषाध्यक्ष पदासाठी नितीन दलाल आणि मयांक खांडवाला यांच्यात लढत होण्याची दाट शक्यता आहे. संयुक्त सचिव पदासाठी म्हाडदळकर गटाकडून डॉ. पी. व्ही. शेट्टी व रवी सावंत यांची नावे निश्चित मानली जात असली तरी प्रतिस्पर्धी गटाची नावे शनिवारीच स्पष्ट होऊ शकतील. तसेच कार्यकारिणी सदस्यांच्या ११ जागांसाठीही चुरस पाहायला मिळणार असून एकंदर ३३ उमेदवारांपैकी अंतिम उमेदवारांच्या यादीत प्रवीण अमरे, विनोद देशपांडे, दीपक मुरकर, नदीम मेमन, राजेंद्र फातर्पेकर, पंकज ठाकूर, श्रीकांत तिगडी अशी दिग्गजांची नावे शिल्लक असतील.