स्लोव्हाकियाविरुद्धच्या विश्वचषक पात्रता फेरीच्या सामन्यासाठी संधी

पुढील आठवडय़ात स्लोव्हाकियाविरुद्धच्या लढतीसाठी इंग्लंड फुटबॉल संघात मिचेल अँटोनिओला संघात स्थान दिले आहे. इंग्लंड संघाचे व्यवस्थापक सॅम अ‍ॅलारडय़ुस यांच्या नेतृत्वाखालील पहिल्याच दौऱ्यात इंग्लंड संघाचा चेहरामोहरा बदलला आहे. वेस्ट हॅम क्लबचा मध्यरक्षक म्हणून खेळणाऱ्या अँटोनिओने प्रीमिअर लीगच्या मँचेस्टर सिटीविरुद्धच्या लढतीत गोल केला होता. वर्षभरापूर्वी नॉटिंगहॅम फॉरेस्टहून वेस्ट हॅमकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता.

वेस्ट हॅमचे प्रतिनिधित्व करताना गेल्या हंगामात अँटोनिओने ३२ लढतींत ९ गोल केले होते. ही कामगिरी लक्षात घेऊनच त्याला इंग्लंड संघात संधी देण्यात आली आहे. ‘‘अँटोनिओ अफलातून फॉर्ममध्ये आहे. त्यामुळेच त्याला योग्य वेळी संधी मिळाली आहे,’’ अशा शब्दांत व्यवस्थापक अ‍ॅलारडय़ुस यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले आहे. अगदी आतापर्यंत लंडनमधील प्राथमिक स्वरूपाच्या स्पर्धामध्ये खेळणाऱ्या अँटोनिओला समाविष्ट केल्यामुळे अ‍ॅलारडय़ुस यांच्यावर टीका झाली होती.

दरम्यान प्रीमिअर लीग स्पर्धेच्या जेतेपदासह लिस्टर सिटीने इतिहास घडवला होता. लिस्टर सिटीच्या विजयाचा शिल्पकार जेमी व्हॅर्डी इंग्लंड संघाचा भाग आहे. गोलरक्षक जो हार्टला संघात कायम ठेवण्यात आले आहे. अ‍ॅलारडय़ुस यांनी कर्णधाराची घोषणा केलेली नाही. युरो २०१६ स्पर्धेत रुनीने कर्णधारपद भूषवले होते. संघात मध्यरक्षक म्हणून त्याला समाविष्ट करण्यात आले आहे.

संघ

फ्रेझर फोरस्टर, जो हार्ट, टॉम हिटन, गॅरी काहिल, नॅथिइल क्लायन, फिल जेगइलका, डॅनी रोस, ल्यूक शॉ, ख्रिस स्माइलिंग, जॉन स्टोन्स, कायले वॉकर, डेल अली, मिचेल अँटोनिओ, इरिक डायर, डॅनी ड्रिंकवॉटर, जॉर्डन हेंडरसन, अ‍ॅडम ललाना, वेन रुनी, रहीम स्टर्लिग, थिओ वॉलकॉट, हॅरी केन, डॅनियल स्टुरिज, जेमी व्हॅर्डी