भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वसीम जाफर आज ४४ वर्षांचा झाला आहे. वसीम जाफरच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. १६ फेब्रुवारी १९७८ रोजी मुंबईत जन्मलेल्या वसीम जाफरच्या वाढदिवसानिमित्त इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉननेही शुभेच्छा दिल्या, पण त्याची अभिनंदन करण्याची शैली इतरांपेक्षा वेगळी ठरली.
मायकेल वॉन आणि वसीम जाफर यांची सोशल मीडियावर एक वेगळीच आंबट-गोड केमिस्ट्री आहे. ते ट्विटरद्वारे एकमेकांना टोमणे मारत असतात. चाहत्यांना यांचे मैदानाबाहेरील क्रिकेट पाहायलाही आवडते. वॉनने ट्विटरवर वसीम जाफरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहिले, ”माझी पहिली कसोटी विकेट वसीम जाफरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”
हेही वाचा – VIDEO : रनआऊटची संधी सोडली, तरीही विकेटकीपरचं होतंय तुफान कौतुक; वाचा कारण!
प्रत्युत्तरात जाफरनेही वॉनसाठी दमदार ट्वीट केले आहे. जाफरने वॉनला धन्यवाद देताना ”माझी कायमची सोशल मी़डिया विकेट” असे म्हटले आहे. वॉनने आपल्या कारकिर्दीत वसीम जाफरची विकेट घेतली होती. वॉनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत एकूण ६ विकेट घेतल्या आहेत. २००२ मध्ये लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात वॉनने ५३ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर जाफरला नासिर हुसेनकरवी झेलबाद केले होते.