मीनाक्षी भोईटे या पुण्याच्या खेळाडूने मुंबईच्या अवरील डेव्हिड हिच्यावर मात करीत तेरा वर्षांखालील गटाच्या राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत अनपेक्षित विजय नोंदविला. तिने चौथ्या फेरीअखेर संयुक्त आघाडी घेतली आहे.
मनोहर मंगल कार्यालय येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मीनाक्षी हिने अवरील हिच्याविरुद्ध डावाच्या मध्यास खेळावर नियंत्रण मिळविले व तेथून डावावरील पकड मजबूत करीत विजय मिळविला. तिने प्रचिती चंद्रात्रेय (नाशिक) व सुभश्मिता साहू (चंद्रपूर) यांच्या साथीत आघाडी मिळविली आहे. त्यांचे प्रत्येकी चार गुण झाले आहेत. प्रचिती या अव्वल मानांकित खेळाडूने औरंगाबादच्या तनिशा बोरामणीकर हिच्यावर मात केली. साहू हिने मुंबईच्या युती पटेल हिला पराभवाचा धक्का दिला. अवरील, तनिशा व युती यांचे प्रत्येकी तीन गुण झाले आहेत.
मुलांमध्ये अहमदनगरच्या संकर्ष शेळके या अव्वल मानांकित खेळाडूने पुण्याच्या केवल निर्गुण याच्यावर मात केली. संकर्ष याने संकल्प गुप्ता, रोनित दास (नागपूर), भाविक भरांबे, पुष्कर ढेरे (मुंबई), यांच्या साथीत प्रत्येकी चार गुणांसह आघाडी मिळविली. संकल्प याने पुण्याच्या ओजस कर्नावट याला हरविले तर रोनित याने मुंबईच्या खुशाल करेलिया याचा पराभव केला. पुष्कर याने मुंबईच्याच आदित्य गुहागरकर याला हरविले. भाविक याने पुण्याच्या मनोज जैन याचा पराभव केला.