* विश्वनाथन आनंद वि. मॅग्नस कार्लसन यांच्यातील विश्वविजेतेपदाची लढत आजपासून
* सहाव्या विश्वविजेतेपदासाठी आनंद उत्सुक
संपूर्ण क्रिकेटजगताचे लक्ष सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीच्या कसोटीकडे लागले असताना बुद्धिबळचाहत्यांसाठी पर्वणी असलेल्या महासंग्रामाची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. बुद्धिबळाच्या गेल्या ४० वर्षांच्या इतिहासातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशी विश्वविजेतेपदाची लढत शनिवारपासून गतविजेता विश्वनाथन आनंद आणि त्याचा आव्हानवीर मॅग्नस कार्लसन यांच्यात शनिवारपासून रंगणार आहे. विश्वविजेतेपदाचा मुकुट परिधान कोण करणार, याकडे तमाम बुद्धिबळप्रेमींचे लक्ष लागले आहे.
पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणारा आनंद आणि जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानी असलेला २२ वर्षीय कार्लसन यांच्या लढतीची तुलना १९७२मध्ये रंगलेल्या बॉबी फिशर आणि बोरिस स्पास्की यांच्यातील लढतीशी केली जात आहे. चेन्नईतील हयात रिजेंसी हॉटेलमध्ये ९ ते २८ नोव्हेंबरदरम्यान रंगणाऱ्या या लढतीत दोन्ही खेळाडूंना १२ डावांत प्रत्येकी सहा वेळा पांढऱ्या आणि काळ्या मोहऱ्यांसह खेळण्याची संधी मिळणार आहे.
कार्लसन जगज्जेतेपदासाठी दावेदार
आनंदला विश्वविजेतेपदाच्या लढतीत खेळण्याचा गाढा अनुभव असला तरी कार्लसन पहिल्यांदाच पहिल्यांदाच विश्वविजेतेपदाची लढत खेळत आहे. पण तरीही जगज्जेतेपदासाठी कार्लसनलाच प्रमुख दावेदार मानले जात आहे. पहिल्यावहिल्या पत्रकार परिषदेत कार्लसन काहीसा तणावग्रस्त जाणवत होता. पण परिषद संपल्यानंतर आपण विश्वविजेतेपदावर कब्जा करण्यासाठी सज्ज असल्याचा विश्वास त्याने बोलून दाखवला.
आनंदच्या अनुभवाची कसोटी
आनंदने २०००, २००७, २००८, २०१० आणि २०१२मध्ये विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवली असली तरी त्याला पहिल्या डावात काळ्या मोहऱ्यांसह खेळण्याचा अनुभव आहे. काळा रंग हा बुद्धिबळातील काहीसा नावडता रंग मानला जातो. २००८मध्ये त्याने व्लादिमिर क्रॅमनिकविरुद्ध तर २०१०मध्ये व्हेसेलिन टोपालोवविरुद्ध काळ्या मोहऱ्यांसह सुरुवात करूनही विजेतेपदावर नाव कोरले होते. सहाव्या विश्वविजेतेपदासाठी उत्सुक असलेल्या आनंदच्या अनुभवाची मात्र कारकिर्दीतील सर्वात खडतर आव्हानाला सामोरे जाताना कसोटी लागणार आहे.
लढती अशा रंगतील
क्लासिकल पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या सर्व १२ डावांमध्ये प्रत्येक खेळाडूला पहिल्या ४० चाली रचण्यासाठी १२० मिनिटे मिळतील. त्यानंतरच्या २० चालींसाठी ६० मिनिटे तर उर्वरित डावासाठी १५ मिनिटे दिली जातील. त्यामुळे ६१व्या चालीपासून प्रत्येक ३० सेकंदात दोन्ही खेळाडूंना चाल करावी लागेल. १२व्या डावाआधी ६.५ गुण पटकावणारा खेळाडू विश्वविजेतेपदाचा मानकरी होईल. त्यानंतर विजेत्याला बक्षिसाच्या रकमेतील ६० टक्के रक्कम मिळेल. १२ डावांनंतर बरोबरी झाल्यास सामन्याचा निकाल ट्रायब्रेकरद्वारे लागेल. लढत ट्रायब्रेकरमध्ये गेल्यास विजेत्याला ५५ टक्के रक्कम बक्षिस म्हणून मिळेल. १०व्या डावापर्यंत प्रत्येकी एका दिवसाच्या विश्रांतीनंतर लागोपाठ दोन डाव खेळावे लागतील. पण १०व्या डावानंतर एका दिवसाच्या विश्रांतीनंतर एकच डाव खेळावा लागेल. एखादा खेळाडू आजारी पडल्यास त्याला पुढील डाव एका दिवसाने लांबणीवर टाकण्याची परवानगी मिळेल.
लढतीची जय्यत तयारी
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या हस्ते या लढतीचे उद्घाटन होईल. तामिळनाडू सरकारने या लढतीसाठी २९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून १४ कोटी रुपये बक्षिसाच्या रूपाने देण्यात येतील. या लढतीसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून दोन्ही खेळाडू काचेच्या बंद खोलीत शनिवारी दुपारी तीन वाजता एकमेकांसमोर असतील. चाहत्यांच्या आवाजाचा त्रास होऊ नये, यासाठी ही संकल्पना राबवण्यात आली आहे. या लढतीचे थेट समालोचन माजी विश्वविजेती सुसान पोल्गर, आंतरराष्ट्रीय मास्टर लॉरेन्स ट्रेन्ट आणि तानिया सचदेव करणार आहे.
थेट प्रक्षेपण : डीडी स्पोर्ट्स,
वेळ : दुपारी ३ वाजल्यापासून.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी नेहमीप्रमाणेच या लढतीसाठी जय्यत तयारी केली आहे. काही महिन्यांच्या खडतर सरावानंतर मी आक्रमक चाली रचण्यासाठी सज्ज आहे. घरच्या चाहत्यांसमोर खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. सामन्याचा निकाल काय लागेल, हे सांगणे कठीण असले तरी प्रत्यक्ष आव्हानाला सामोरे जाण्यासाठी मी तयार आहे. या लढतीत माझा अनुभव पणाला लागणार आहे.
– विश्वनाथन आनंद

विश्वविजेतेपदासाठी मी प्रबळ दावेदार असल्याचे भाकीत तज्ज्ञांनी वर्तवले आहे. पण मी त्याचा फारसा विचार करत नाही. चांगली कामगिरी करण्याकडे माझे लक्ष लागले आहे. मी माझी क्षमता आणि गुणवत्तेनुसार खेळ केल्यास, आनंदवर नक्कीच विजय मिळवेन, असे मला वाटते. आनंदचा सामना करण्यासाठी मी सज्ज आहे.
– मॅग्नस कार्लसन

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mind game chess world championship game
First published on: 09-11-2013 at 01:38 IST