दोहा : माजी जागतिक विजेती वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानूने कतार आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेतील महिलांच्या ४९ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.
ऑलिम्पिक पात्रता प्रकारात चानूने १९४ किलो वजन उचलत जेतेपदाला गवसणी घातली. टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची अंतिम क्रमवारी जाहीर झाल्यानंतरच पात्रता स्पष्ट होऊ शकेल.
२०१८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या २४ वर्षीय मीराबाईने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क प्रकारात प्रत्येकी एकदाच यशस्वी वजन उचलले. तिने स्नॅच प्रकारात ८३ किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात १११ किलो वजन उचलले. फ्रान्सच्या अॅनाइस मायकेल (१७२ किलो) आणि मेनन लॉरेंट्झ यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले.
मीराबाईची २०१ किलो ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे. चालू वर्षांच्या पूर्वाधिात झालेल्या जागतिक अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत तिने ही किमया साधली होती. तिने स्नॅचमध्ये ८७ किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात ११४ किलो वजन उचलले होते.