भारतीय शरीरसौष्ठव महासंघाच्या वतीने ‘मि. इंडिया’ ही मानाची शरीरसौष्ठव स्पर्धा शुक्रवारपासून कोचीमध्ये रंगणार आहे. ही स्पर्धा २२ ते २४ मार्च या कालावधीमध्ये होणार असून या स्पर्धेसाठी ३० जिल्हे, ५ क्रीडा संस्थांसहित चारशेहून अधिक शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेत ‘महाराष्ट्र-श्री’ ठरलेला संग्राम चौगुले आणि ‘नवी मुंबई-श्री’ चा मान पटकावलेला नौदलाचा मुरली कुमार यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळेल. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही महिलांसाठी ‘मिस इंडिया फिटनेस फिजिक’ या स्पर्धेचेही आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी ५० महिला शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग नोंदवला आहे.
कोचीमधील बोलघट्टी पॅलेसमध्ये ही स्पर्धा रंगणार असून गटविजेत्याला प्रत्येकी ५० हजारांचे पारितोषिक देण्यात येणार आहे, तर विजेत्याला तीन लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. २२ मार्चला खेळाडूंची वजन तपासणी करण्यात येणार असून २३ मार्चला प्राथमिक फेरी होणार आहे. प्राथमिक फेरीचा अडसर पार करणाऱ्या खेळाडूंमध्ये २४ मार्चला ‘मि.इंडिया’ची स्पध्रेची अंतिम फेरी रंगणार आहे.