Mohammad Nabi son Hassan Eisakhil: क्रिकेटच्या मैदानात अनेकदा अचंबित करणाऱ्या घटना घडत असतात. आजवर भावा-भावाच्या जोड्या क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळाल्या आहेत. आयपीएल सारख्या स्पर्धांमुळे एकाच संघात दोन भाऊ किंवा एकमेकांसमोर उभे ठाकलेले भाऊ आपण पाहिले आहेत. पण अफगाणिस्तानच्या एका क्रिकेट स्पर्धेत एक दुर्मिळ प्रकार पाहायला मिळाला. अफगाणिस्तानच्या प्रसिद्ध शपागीजा क्रिकेट लीगमध्ये बाप आणि मुलगा वेगवेगळ्या संघातून एकमेकांसमोर आले. एवढेच नाही तर वडिलांच्या गोलंदाजीवर मुलाने पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकारही लगावला. या प्रसंगाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अफगाणिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद नबी आणि त्याचा मुलगा हसन ईसाखिल हे शपागीजा क्रिकेट लीग स्पर्धेत एकमेकांविरोधात खेळत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कदाचित हा पहिलाच प्रसंग असावा जिथे बाप आणि मुलगा एकाच स्पर्धेत क्रिकेट खेळत आहेत.
शपागीजा क्रिकेट लीगमध्ये २२ जुलै रोजी आमो शार्क्स विरुद्ध मिस आइनाक नाइट्स यांच्या दरम्यान सामना झाला. मोहम्मद नबी मिस आइनाक नाइट्स या संघातून तर त्याचा मुलगा हसन हा आमो शार्क्स संघातून खेळत आहे. ४० वर्षीय मोहम्मद नबी गोलंदाजी करण्यासाठी आला असता १८ वर्षीय मुलगा हसनने पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार लगावला.
सामन्यातील नववे षटक टाकण्यासाठी मोहम्मद नबी आला तेव्हा हसनने पहिल्याच चेंडूवर गुडघ्यावर बसत मिड विकेटच्या दिशेने षटकार लगावला. या षटकात नबीने एकूण १२ धावा दिल्या. या षटकानंतर नबीला पुन्हा गोलंदाजी दिली गेली नाही. दुसरीकडे हसनने मात्र ३६ चेंडूत ५२ धावा चोपल्या. ज्यात ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
दरम्यान या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकजण यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. मुलाने उत्तुंग षटकार ठोकल्यानंतर बापला खरंतर अभिमान वाटायला हवा. मात्र मुलगा जेव्हा प्रतिस्पर्धी असतो, तेव्हा मात्र भावना वेगळी असते, असे नेटिझन्स म्हणत आहेत. हसनने षटकार ठोकल्यानंतर मोहम्मद नबी ज्या पद्धतीने हवेत गेलेल्या चेंडूकडे पाहत राहिला, त्यावरूनही मोहम्मद नबीवर अनेकजण गमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत.
हसन ईसाखीलचा जन्म २८ जुलै २००६ मध्ये झाला. उजव्या हाताने फलंदाजी करणारा हसनची खेळण्याची शैली आक्रमक आहे. अफगाणिस्तानचा १९ वर्षांखालील संघ, आमो शार्क्स आणि स्पीनघर टायगर्स या संघासाठी तो क्रिकेट खेळत आहे.