Mohammad Siraj Clean Bowled Brandon King Video: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजने आपल्या भेदक गोलंदाजीने कहर केला आहे. विडिंज संघाने या सामन्याची नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय संघाने गोलंदाजीत चांगली सुरूवात केली. वेस्ट इंडिजने ५० धावांच्या आत ४ विकेट्स गमावले आहेत. सिराजने एकट्याने ३ विकेट्स घेतले आहेत. यापैकी ब्रेंडन किंगला केलेलं क्लीन बोल्डचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
मोहम्मद सिराजने इंग्लंड कसोटीत उत्कृष्ट कामगिरी केली होती. सिराजने अखेरच्या कसोटी सामन्यात भेदक गोलंदाजी करत भारताच्या विजयात सर्वात मोठी भूमिका बजावली होती. त्याने पहिल्या डावात ४ विकेट्स आणि दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेतल्या होत्या. सिराज इंग्लंड दौऱ्यावर आपल्या गोलंदाजीच्या उत्कृष्ट फॉर्मात होता. तोच फॉर्म त्याने वेस्ट इंडिजविरूद्ध मालिकेत कायम ठेवला आहे.
मोहम्मद सिराजने विडिंजविरूद्ध पहिल्या कसोटीत स्पेलमधील पहिली दोन मेडन षटकं टाकत विकेट घेतली. त्यानंतर ब्रेंडन किंगला टाकलेला चेंडू कमाल होता. मोहम्मद सिराजने योग्य लाईन लेंग्थसह टाकलेला चेंडू किंगने सोडला आणि तो थेट मिडिल स्टंपवर जाऊन आदळला. यासह सिराजने उत्कृष्ट चेंडूवर किंगला क्लीन बोल्ड केलं. किंगने सिराजचा चेंडू फटका न खेळता सोडल्याने सर्वच चकित झाले. पण सिराजने मात्र त्याचं काम पूर्ण केलं. सिराजच्या या विकेटचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
सिराज आणि बुमराहने वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांना माघारी पाठवलं. तेजनारायण चंद्रपॉल खातंही न उघडता सिराजच्या गोलंदाजीवर माघारी परतला. सिराजनंतर बुमराहने दुसरा सलामीवीर कॅम्पबेलला माघारी धाडलं. ध्रुव जुरेलने विकेटच्या मागे उत्कृष्ट कामगिरी करत या विकेटमध्ये मोठी भूमिका बजावली. सिराजने यानंतर ब्रेंडन किंगला त्रिफळाचीत करत माघारी धाडलं. त्यानंतर सिराजने अथानेजला झेलबाद केलं. सिराजने पहिल्याच सत्रात कमालीची गोलंदाज करत ७ षटकांत १७ धावा देत ३ मोठ्या विकेट्स घेतल्या आहेत.