Mohammed Shami slams trolls over ‘Sajda’ : विश्वचषक २०२३ मध्ये घरच्या मैदानावर ५० षटकांच्या स्पर्धेत शमी हा भारतासाठी हुकुमी एक्का ठरला होता. पहिल्या चार सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हन मध्ये स्थान मिळवू शकला नसतानाही तो स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला. शमीने घेतलेल्या प्रत्येक विकेटला भारतीयांनी सुद्धा जल्लोष साजरा केला होता पण मोहम्मद शमीने श्रीलंकेविरुद्धच्या गट सामन्यात पाच बळी घेतल्यानंतर त्याच्या सेलिब्रेशनबद्दलच्या काही अफवा व्हायरल झाल्या होत्या. शमीला ‘सजदा’ करायचा होता म्हणून तो मैदानात खाली बसला पण त्याला लगेच जागेचं भान आल्याने त्याने तसं करणं टाळलं अशा प्रकारच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या, साहजिकच काही प्रमाणात यावरून ट्रोलिंग सुद्धा सुरु होतं. मात्र आता या सर्व चर्चांवर शमीने प्रतिक्रिया देत ट्रोलर्सचं तोंड बंद केलं आहे.

मोहम्मद शमीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, शमी श्रीलंकेच्या डावाच्या १३ व्या षटकात कसून राजिताला त्याच्या ५ विकेट्स पूर्ण करण्यासाठी गुडघे टेकून दोन्ही हातांनी जमिनीला स्पर्श करताना दिसला. सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या एका गटाने शमीचे सेलिब्रेशन पाहिल्यानंतर असा दावा केला की त्याला मैदानावर प्रार्थना करायची होती, परंतु प्रतिक्रियेच्या भीतीने त्याने स्वतःला रोखले. उल्लेखनीय म्हणजे, पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने श्रीलंकेविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात मैदानावर नमाज पठण करून शतक साजरे केले होते.

“मी या देशात का राहू”, शमी असं का म्हणाला?

शमीने १३ डिसेंबर रोजी अजेंडा आजतकवर बोलताना सांगितले की तो एक अभिमानी भारतीय आणि अभिमानी मुस्लिम आहे आणि जर त्याला प्रार्थना करायची असेल तर त्याला कोणीही प्रार्थना करण्यापासून रोखले नसते. शमी म्हणाला की, “मला नमाज पठण करायचं असेल तर मला कोण अडवू शकेल? मी कोणाला नमाज पठण करण्यापासून थांबवणार नाही. जर मला प्रार्थना करायची असेल तर मी प्रार्थना करेन. यात काय हरकत आहे? मी मुस्लिम आहे हे मी अभिमानाने सांगेन. मी भारतीय आहे हे अभिमानाने सांगेन. मला कोणाकडून नमाज पठण करण्याची परवानगी मागायची असेल तर मग मी या देशात राहूच कशाला? आधी कधी ५ विकेट्स घेतल्यानंतर प्रार्थना केली आहे का? मी अनेकदा पाच बळी घेतले आहेत. तुम्ही मला सांगा की तुम्हाला कुठे प्रार्थना करायची आहे आणि मी तिथे जाऊन प्रार्थना करेन. “

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रीलंकेच्या सामन्यात तेव्हा नेमकं झालं काय होतं, शमी म्हणतो..

“असे लोक कोणाच्याही बाजूने नाहीत. त्यांना फक्त गोंधळ घालायचा आहे. मी श्रीलंकेविरुद्धच्या त्या सामन्यात २०० टक्के तीव्रतेने गोलंदाजी केली. एकापाठोपाठ विकेट पडत होत्या आणि ३ विकेट्स घेतल्यानंतर मला वाटले की मला एक विकेट घ्यावी लागेल. आज पाच विकेट्स काढल्या. कितीतरी वेळा बॅटच्या कडेवर मारूनही विकेट न मिळाल्याने मी कंटाळलो होतो. मी पूर्ण झुकत गोलंदाजी करत होतो. म्हणून जेव्हा माझी पाचवी विकेट पडली तेव्हा मी जमिनीवर कोसळलो आणि गुडघे टेकले. लोकांनी त्याचा वेगळा अर्थ काढला. मला वाटतं जे लोक या गोष्टींचा चुकीचा अर्थ लावत आहेत त्यांच्याकडे दुसरे काम नाही,” शमी पुढे म्हणाला.