भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकावे लागले. शमी भारतीय संघाचा सध्याचा मुख्य गोलंदाज म्हणून ओळखला जातो, पण गेल्या महिन्याभरापासून तो दुखापतीचा सामना करत आहे. क्रिकेटपासून सध्या दूर असल्याने सोशल मीडियावर व्यक्त होण्यासाठीचा वेळ त्याच्याकडे असतो. तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच शमीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक अनोखा व्हिडिओ शेअर केला असून नेटीझन्स आणि शमीच्या चाहत्यांमध्ये हा व्हिडिओ चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.
शमीने क्रिकेटला थोडा आराम देऊन आपल्या कुटुंबियांसोबत वेळ व्यतित केला. शमीने आपल्या चिमुकल्या मुलीसोबतचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. शमीची मुलगी आयरा हिला देखील आपल्या बाबांसारखीचे गोलंदाजीची आवड असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. मैदानात भल्याभल्यांना आपल्या भेदक माऱयाने घायाळ करणारा शमी यावेळी चिमुकल्या आयराच्या गोलंदाजीचा सामना करताना पहायला मिळाला. आयराच्या आईने देखील आपल्या चिमुकलीला गोलंदाजी करण्यासाठी मदत केली. तर शमी चिमुकलीच्या गोलंदाजीवर सावध पवित्रा घेऊन खेळत आहे.
दुखापतीमुळे शमीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकावे लागले असले तरी उर्वरित दोन सामन्यांसाठी संघात पुनरागमनासाठी शमी प्रयत्नशील आहे. यासाठीची पूर्वतयारी म्हणून शमी विजय हजारे करंडक स्पर्धेत पश्चिम बंगालच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेत आपली फिटनेस सिद्ध करून राष्ट्रीय संघात पुनरागमनाची तयारी करणार असल्याचा विश्वास यावेळी शमीने व्यक्त केला.
इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत तिसऱया कसोटी सामन्यात गोलंदाजीवेळी मोहम्मद शमीला दुखापत झाली होती. त्यानंतर शमी भारतीय संघासाठी खेळू शकलेला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुण्यातील कसोटीत भारतीय संघाच्या पराभवावर बोलताना शमीने पहिली कसोटी जरी भारतीय संघाने गमावली असली तरी उर्वरित कसोटी सामने भारतच जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला.